अपहृत मुलाच्या अकाउंटवरून वडिलांकडे मागितले २० लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:53 IST2025-12-30T13:50:08+5:302025-12-30T13:53:41+5:30
क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडेल्या १७ वर्षीय मुलाचे रविवारी ऐरोली परिसरातून अपहरण करण्यात आले...

अपहृत मुलाच्या अकाउंटवरून वडिलांकडे मागितले २० लाख
नवी मुंबई : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. या आराेपींनी अपहरण केलेल्या मुलाच्याच इन्स्टाग्रामवरून वडिलांच्या इन्स्टाग्रामवर व्हाइस नोट पाठवून खंडणी मागितली होती. त्यानुसार मुलाच्या सुटकेसाठी दीड लाख रुपये आरोपींना दिले होते. २० लाख दिले नाहीत, तर मुलाची हत्या करू, अशी धमकी त्यांना देत होते.
क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडेल्या १७ वर्षीय मुलाचे रविवारी ऐरोली परिसरातून अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी वडिलांकडे इन्स्टाग्रामवरून २० लाख रुपये मागितले होते. अन्यथा मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तक्रार मिळताच रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली होती. त्यासाठी गुन्हे शाखा सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, सहायक निरीक्षक नीलेश बनकर, उपनिरीक्षक अभय काकड, अजहर मिर्झा, विशाल सावरकर, भारत सानप, विश्वास भोईर यांचे पथक तपास करत होते.
मुलीच्या नावाने मैत्री
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीमधून कडी-कडी जोडून कल्याण गाठले. त्या ठिकाणी एका फ्लॅटमधून अपहृत अल्पवयीन मुलाची सुटका करून प्रदीप जैस्वाल (२३), विशाल पासी (१९), चंदन मौर्या (१९) व सत्यम यादव (१९) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवरून पीडित अल्पवयीन मुलासोबत मैत्री वाढवली होती.