- नामदेव मोरेनवी मुंबई : अलिबागजवळील ४०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये खाडीच्या बाजूची तटबंदी कोसळली आहे. अनावश्यक झुडपे व वृक्ष हटविले नाहीत तर गडाच्या चारही बाजूची तटबंदी व बुरुजांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती इतिहासप्रेमींनी व्यक्त केली आहे.गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून, रायगड जिल्ह्यास हे वैभव मोठ्या प्रमाणात लाभले आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगडसह अनेक महत्त्वाचे गड व जलदुर्ग जिल्ह्यामध्ये असून, त्यामध्ये अलिबागजवळील कोर्लईचा समावेश आहे. अलिबागवरून मुरूड-जंजिऱ्याकडे जातानाच्या डोंगरावर हा किल्ला आहे. जवळपास एक किलोमीटर लांबी व ३० मीटर रुंदीचा किल्ला दुर्गप्रेमींचे आकर्षण ठरत आहे. दुर्गभ्रमंती करणारे तरुण व इतिहासप्रेमी नागरिकांची पावले कोर्लईकडे वळू लागली आहेत.गडावरील मंदिर, चर्च, जुन्या बांधकामाचे अवशेष, प्रत्येक बुरुजावर बसविलेल्या तोफा व गडावरून दिसणारे कुंडलिका खाडीचे सौंदर्य यामुळेही येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गडाच्या पायथ्याशी असणा-या बीपीटीच्या लाइट हाउसमधून किल्ल्यावर जाण्यासाठी छोटी पायवाट आहे. बीपीटी व्यवस्थापनाने लाइट हाउसच्या छतावर जाऊन समुद्र व गडाची तटबंदी पाहण्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय इतर दोन बाजूंनी गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. गडावरील मंदिर व चर्चच्या परिसराची पुरातत्त्व विभागाकडून देखभाल केली जात आहे. कर्मचाºयांची नियुक्तीही नियुक्ती केली आहे. कर्मचाºयांकडून गडाच्या मुख्य भागाची चांगल्या प्रकारे देखभाल होत असली तरी खाडीच्या बाजूच्या भागात वाढलेले गवत अद्याप काढलेले नाही. यामुळे भटकंती करणाºयांना अडथळे येऊ लागले आहेत.गडाच्या बुरूज व तटबंदीची सुरक्षा धोक्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये एक बाजूच्या तटबंदीचा काही भाग कोसळला आहे. चारही बाजूला बुरुजांसह तटबंदीमध्ये वृक्ष व झुडपे वाढली आहेत. वृक्षांच्या मुळ्यांमुळे तटबंदी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनावश्यक वाढलेली झुडपे तत्काळ काढणे आवश्यक आहे. ती काढली नाहीत तर भविष्यात गडाचा भाग कोसळण्यास सुरुवात होईल व किल्ल्याचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. गडावर येणाºया पर्यटकांना माहिती उपलब्ध होईल, असे फलक लावलेले नाहीत. गडाच्या इतिहासाची माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. राज्यातील सर्वाधिक तोफा असलेल्या गडावर कोर्लईचाही समावेश होतो. काही तोफांसाठी गाडा तयार करण्यात आला आहे. काही अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तोफांची देखभाल करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक करीत आहेत.
कोर्लई किल्ल्याचे बुरूज ढासळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 02:19 IST