पोलीस बेपत्ता, कळंबोलीत तलावात सापडलेला मृतदेह कुणाचा? सडल्याने ओळख पटवणे कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:39 IST2025-09-25T15:36:29+5:302025-09-25T15:39:05+5:30
Navi Mumbai: नवी मुंबईतील कळंबोली परिसरात असलेल्या एका तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सडला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.

पोलीस बेपत्ता, कळंबोलीत तलावात सापडलेला मृतदेह कुणाचा? सडल्याने ओळख पटवणे कठीण
Navi Mumbai Crime News : एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तलावात सापडल्याने खळबळ उडाली आहे. कळंबोली येथील तलावात हा मृतदेह तरंगताना दिसला. घटनास्थळ हे बेपत्ता पोलीस नाईक सोमनाथ फापाळे यांच्या घरापासून काही अंतरावर आहे. यामुळे त्यांच्या नातेवाइकांमार्फत देखील मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कळंबोली येथील तलावात पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली. यावरून मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेह पुरुषाचा असून, अनेक दिवस पाण्यात राहिल्याने कुजलेल्या अवस्थेत आहे.
प्रथमदर्शनी पाहणीतून मृतदेहाची ओळख पटू शकलेली नसल्याचे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले.
पोलिसांच्या तपासणीत ५ सप्टेंबरला फापाळे तुर्भे, कळंबोली व कामोठे परिसरात ये-जा करताना सीसीटीव्हीत दिसून आले आहे.
वैद्यकीय चाचणीतून ओळख पटवण्याचा प्रयत्न
गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्तालयाबाहेर ठिय्या मांडून सोमनाथ यांचा शोध लागत नसल्याचा संताप देखील व्यक्त केला होता. ५ सप्टेंबरनंतर ते दिसून आले नाहीत.
अशातच मंगळवारी तलावात मृतदेह मिळून आल्याने पोलिसांकडून फापाळे यांच्या कुटुंबीयांमार्फत ओळख पटवण्याचा प्रयत्न झाला. त्यातूनही काही स्पष्ट न झाल्याने वैद्यकीय चाचणी, डीएनएच्या मदतीने ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही पोलिस उपायुक्त मोहिते यांनी सांगितले. त्यामुळे मृतदेहाचा तिढा अद्याप सुटलेला नसून, पोलिस अधिक तपास करत आहेत.