VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 22:13 IST2025-10-08T22:13:02+5:302025-10-08T22:13:59+5:30
PM Modi speaking marathi, Navi Mumbai Airport Inaugeration: मोदींनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली.

VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
PM Modi speaking marathi, Navi Mumbai Airport Inaugeration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या विमानतळासाठी अंदाजे १९ हजार ६५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज मुंबईची दीर्घ प्रतीक्षा संपली आहे. मुंबईला आता दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे. हे विमानतळ आशियातील सर्वात मोठे कनेक्टिव्हिटी हब म्हणून या प्रदेशाची स्थापना करण्यात मोठी भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी ते मराठीतही बोलले.
पंतप्रधान मोदी मराठीत काय बोलले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला सर्व उपस्थितांची नावे घेतली. त्यानंतर त्यांनी काही वेळ मराठीतून संवाद साधला. "विजयादशमी झाली कोजागिरी पौर्णिमा ही झाली आणि आता दहा दिवसांनी दिवाळी तुम्हाला या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो," असे म्हणत मोदी मराठीतून दोन वाक्य बोलले. त्यानंतर त्यांनी हिंदीतून आपल्या पुढील भाषणाला सुरूवात केली आणि देशाच्या प्रगतीमध्ये नवी मुंबई विमानतळाचे योगदान कसे असेल याकडे लक्ष वेधले.
२०१४ मध्ये देशात ७४ विमानतळे, आज संख्या १६०च्या पार
मोदी म्हणाले, "जेव्हा स्वप्ने पूर्ण करण्याचा दृढनिश्चय असतो, जेव्हा जलद विकासाचे फायदे देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा असते, तेव्हा परिणाम साध्य होतात. आपल्या हवाई सेवा आणि संबंधित उद्योग हे याचा एक उत्तम पुरावा आहे. २०१४ मध्ये जेव्हा देशाने मला संधी दिली, तेव्हा मी म्हटले होते की माझे स्वप्न होते की चप्पल घालणाऱ्यांनाही विमानाने प्रवास करता यावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशात नवीन विमानतळ बांधणे आवश्यक होते. आपल्या सरकारने या मोहिमेवर गांभीर्याने काम सुरू केले. गेल्या ११ वर्षांत देशात एकामागून एक विमानतळ बांधली गेली आहेत. २०१४ मध्ये आपल्या देशात फक्त ७४ विमानतळ होती, आज भारतात विमानतळांची संख्या १६०च्या पुढे गेली आहे."