पनवेल मनपाचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 18:27 IST2017-11-30T14:35:20+5:302017-11-30T18:27:49+5:30
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी पत्राद्वारे त्यांनी ही धमकी देण्यात आली आहे.

पनवेल मनपाचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे . आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपाल द्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगर पालिकेला पाठविण्यात आले आहे . यासंदर्भात आयुक्त शिंदे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे .
तुम्ही मग्रुरीने पालिकेचा कारभार हाकत आहात . हे कुठेतरी थांबायला हवे आहे . अनेक वेळा प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष भेटून तुम्हाला याबाबत कल्पना देऊन देखील तुमच्या वागण्यात काहीच फरक पडलेला नसल्याने तुम्हाला संपविण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही . तुम्ही वारंवार नगरसेवकांच्या अधिकारांवर घाला घालत आहात . तुम्ही असेस वागलात तर मी तुमच्या चेह-यावर काळे फासेन , तुमच्या चारित्र्यावर डाग लावीन . आम्ही तशी फिल्डिंग मंत्रालयातून लावलेली आहे . या पत्रानंतर व्यवस्थित वागल्यास आम्ही हे सर्व थांबवू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे . तुम्ही ज्या नागरिकांना खूष करण्यासाठी हे सर्व परदर्शक कारभार करता त्या नागरिकांना आम्ही मतदानावेळी तीन हजार रुपये देऊन नगरसेवक म्हणून निवडून आले आहोत . तुमच्यावर अॅट्रोसिटी दाखल करू असेही या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे . आमच्या मर्जीतील कंत्राटदार पालिकेत नेमा . त्याला प्रत्येक महिन्याला आम्हाला भेटायला सांगा तसेच तुम्ही पैसे खात नाही पण आम्ही लागतात असे या धामकिवजा पत्रात नमूद करण्यात आले आहे .
पालिकेतील उपायुक्त सध्या बावनकुळे व जमीर लेंगरेकर यांना देखील उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे .तुमच्या मुळेच हे अधिकारी नागरसेवकांशी मग्रुरीने वागत आहेत . व स्वतःला मुख्यमंत्री असल्याचे समजत आहेत . आयुक्त शिंदे यांनी मला हे पत्र सोमवारी प्राप्त झाले असल्याचे सांगितले . मी माझं वयक्तिक काम करीत नसून जनतेचीच काम करीत आहे . आयुक्त पदापेक्षा संवेदनशील असलेल्या पदांवर मी काम केले आहे . या पत्राला न घाबरता मी अजून जोमाने कामाला लागेन असेही शिंदे यांनी स्पष्ट केले .
- मागील अनेक दिवसापासून पनवेल महानगर पालिकेत सत्ताधारी भाजप नगरसेवक व आयुक्त शिंदे यांच्यात वाद पेटला आहे . आयुक्त मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक खुलेआम करीत आहेत . नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत आयुक्तांविरोधात अॅट्रोसिटी , अविश्वास ठराव आनण्यासंदर्भात उघडपणे चर्चा करण्यात आली होती .त्यामुळे पत्र पाठवणा-यांने मुद्दामून अनेक गोष्टी या पत्रात नमूद केल्या आहेत . यासंदर्भात तक्रार नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे . दि. २३ रोजी हे पत्र पनवेल महानगर पालिकेला प्राप्त झाले आहे.