सिडकोच्या २७२ सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 00:13 IST2019-10-27T00:13:41+5:302019-10-27T00:13:53+5:30
खारघरमध्ये मध्यम व उच्च उत्पन्न गटामधील नागरिकांसाठी व्हॅली शिल्प हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

सिडकोच्या २७२ सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
नवी मुंबई : सिडकोने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खारघरमधील व्हॅली शिल्प व नवी मुंबईमधील सीवूड इस्टेट प्रकल्पातील शिल्लक २७२ घरांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मध्यम व उच्च मध्यम गटातील नागरिकांसाठी ही योजना आहे.
नवी मुंबईमध्ये जास्तीत जास्त गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी व जुन्या प्रकल्पामधील सदनिकांची विक्री करण्यासाठी सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. खारघरमध्ये मध्यम व उच्च उत्पन्न गटामधील नागरिकांसाठी व्हॅली शिल्प हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पातील मध्यम उत्पन्न गटासाठीचे ११९ व उच्च उत्पन्न गटासाठीच्या १३६ घरांची विक्री करण्यात आली नव्हती. या घरांसाठी शनिवारी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते नोंदणी सुरू करण्यात आली. या पूर्वी नवी मुंबईमध्ये बांधलेल्या सीवूड इस्टेट येथील १७ सदनिकांच्या विक्रीसाठीही नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
या विषयी माहिती देताना लोकेश चंद्र यांनी सांगितले की, दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिडकोतर्फे उच्च आणि मध्यम उत्पन्न गटाकरिता घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेविषयी सर्व माहिती सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.