नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:56 IST2025-07-14T11:54:09+5:302025-07-14T11:56:42+5:30
इर्शाळवाडीसारखी मोठी आपत्ती घडू शकते, असा सावधगिरीचा इशारा पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संघटनांनी दिला आहे.

नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
नवी मुंबई : बेलापूर येथील पारसिक टेकडीवर रविवारी भूस्खलन झाल्याने स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींना धक्का बसला. बेलापूरच्या सेक्टर-९ येथील जॉगिंग-वॉकिंग परिसरात ही घटना घडली, जिथे अनेक झाडे आणि मातीचा ढिगारा कोसळल्याची माहिती नॅटकनेक्ट फाउंडेशनने दिली. सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही. भूस्खलनाची तीव्रता कमी असल्याने परिसरातील वाहनांचे नुकसान टळले, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनने सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परिसरातील झाडे भूखंड माफियांकडून तोडली गेल्याबद्दल नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच वेळीच याकडे लक्ष दिले गेले नाही, तर भविष्यात मोठे भूस्खलन होऊन इर्शाळवाडीसारखी आपत्ती ओढवू शकते असा इशारा फाऊडेशन आणि पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या 'एसओएस' संदेशात म्हटले आहे. हा परिसर सिडकोच्या नियंत्रणाखाली आहे, असे वन विभागाने राज्य मानवाधिकार आयोगाकडे दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये स्पष्ट केले आहे अशी माहिती पारसिक आणि बेलापूर टेकड्यांवरील वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू करणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशनने दिली आहे.
सिडको मुख्यालयाच्या अगदी समोर असलेल्या टेकड्यांवर भूखंड करणारे झोपडपट्ट्या आणि बेकायदेशीर धार्मिक इमारती बांधत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सेव्ह बेलापूर हिल्स फोरमचे सह-संयोजक कपिल कुलकर्णी यांनी अधिकारी इर्शाळवाडीसारख्या भूस्खलनाची वाट पाहत आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे.
नॅटकनेक्ट आणि सेव्ह बेलापूर हिल्स फोरमने झाडांची कत्तल आणि मोठ्या भूस्खलनास कारणीभूत ठरू शकणाऱ्या बांधकामांकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी दोन वेळा मानवी साखळ्या करून आंदोलन केले होते.
स्वयंसेवकांनी सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांची अनेक वेळा भेट घेतली, परंतु कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सुदर्शन कर्णावत यांनी सांगितले.