पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 21:41 IST2025-09-27T21:34:50+5:302025-09-27T21:41:53+5:30
बेलापूरच्या ध्रुवतारा जेट्टीजवळ बाईक खाडी कोसळ्यानंतर एक तरुण बेपत्ता झाला आहे.

पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
Belapur Dhruvatara Jetty:नवी मुंबईत शनिवारी सकाळी झालेल्या एका अपघाताने सर्वांनाच धक्का बसला. बेलापूरमधील ध्रुवतारा जेटीवर बाईक चालवत असताना दोन तरुण अचानक खाडीत कोसळले. बेपत्ता असलेल्या तरुणांचा शोध घेतला असता एकाला तात्काळ वाचवण्यात आलं. तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीही अशाच एका अपघातात एक महिला गाडीसह ध्रुवतारा जेट्टीवरुन खाडीत कोसळली होती. सुदैवाने तिचा जीव वाचला होता.
ध्रुवतारा जेटीवर शनिवारी पहाटे आणखी एक दुचाकी खाडीच कोसळली. या दुचाकीवर दोन तरुण होते ज्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं. शनिवारी पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली जेव्हा आयटी फर्ममध्ये काम करणारे श्रेयस अशोक जोग (२३) आणि अथर्व शेळके (२३) हे दोन मित्र एका मित्राला भेटण्यासाठी उलवे रोडमार्गे पनवेलला जात होते. ही दुचाकी जोगची होती जो ऐरोलीचा रहिवासी होता. तो ठाण्यातील एका आयटी फर्ममध्ये काम करत होता. तर अथर्व शेळके हा घरून काम करत होता आणि पनवेलमध्ये त्याच्या बहिणीसोबत राहत होता. अपघाताच्या वेळी तो बाईक चालवत होता आणि अजूनही बेपत्ता आहे.
अथर्व शेळके शुक्रवारी डोंबिवलीत होता आणि शुक्रवारी रात्री तो जोगला भेटण्यासाठी त्याच्या ऐरोली येथील फ्लॅटवर गेला होता. तेथून ते बेलापूरला एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. आठवड्याचा शेवट असल्याने ते रात्रभर तिथेच राहिले आणि शनिवारी ते पनवेलला निघाले होते, अशी माहिती बेलापूर पोलिसांनी दिली.
पनवेलकडे जात असताना अथर्व शेळके उड्डाणपुलावरुन जाण्याच्या ऐवजी जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेला. तिथे रस्ता बंद असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मात्र त्यांना ते दिसले नाही आणि ते रस्त्यावरून वेगाने गेले आणि त्यांची बाईक खाडीत कोसळली. सागरी सुरक्षा पोलिसांची चौकी त्याच ठिकाणी असल्याने त्यांनी ही घटना पाहिली आणि अटल सेतू बचाव पथकाला माहिती दिली. त्यानंतर पथकाने जोगला वाचवले आणि दुचाकी बाहेर काढली. बचाव पथकाने तात्काळ शेळकेचा शोध सुरु केला. मात्र अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही.