Navi Mumbai: ...आणि महिलेने लोकल समोर मारली उडी, मृतदेहाच्या चिंधड्या; खारघर रेल्वे स्थानकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:14 IST2026-03-18T10:11:12+5:302026-03-18T10:14:05+5:30
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकात भयंकर घटना घडली. रेल्वे स्थानकात बसलेल्या एका महिलेने अचानक रेल्वेसमोर उडी मारली.

Navi Mumbai: ...आणि महिलेने लोकल समोर मारली उडी, मृतदेहाच्या चिंधड्या; खारघर रेल्वे स्थानकातील घटना
खारघर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील बाकड्यावर एक महिला बसलेली होती. लोकल रेल्वे स्थानकात शिरत असतानाच महिला उठली आणि रेल्वे गाडीसमोर उडी मारली. हे सगळं क्षणार्धात घडले आणि महिलेल्या मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या. मंगळवारी (१७ मार्च) सायंकाळी ४.४९ वाजता घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक विजय तावडे यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. पोलीस अधिकारी म्हणाले, 'अज्ञात महिला ५० ते ५५ वयोगटातील होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की, खारघर रेल्वे स्थानकातील फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वर महिला बाकड्यावर बसलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने बसलेली महिला ४.४९ मिनिटांनी पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल येताच उठली आणि काही क्षणातच तिने उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनाक्रमामुळे मोटरमनला ब्रेक लावण्यासही वेळ मिळाला नाही.
या घटनेत महिलेचा मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या. ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलीस आणि प्रवाशांनी अनेक तुकड्यामध्ये असलेला महिलेचा मृतदेह वर काढला. त्यानंतर महिलेचा मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
महिलेची ओळख पटलेली नाही. कारण तिच्याजवळ ना मोबाईल आढळून आला, ना कोणते ओळखपत्र. आता महिलेची ओळख पटवण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली जात आहे. महिला बेपत्ता असल्याची तक्रार कुठे दाखल केली गेलीये का? याचीही माहिती घेत आहोत, असेही तावडे यांनी सांगितले.