नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 06:40 IST2025-07-13T06:40:12+5:302025-07-13T06:40:31+5:30
सध्या विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १३,००० कामगार कार्यरत आहेत. विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित सर्व पर्यावरणीय परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत.

नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम यंदाच्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सिडको आणि अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन या विमानतळाचे भव्य उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. त्यामुळे गरज भासल्यास मनुष्यबळ वाढवून कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यामुळे १७ सप्टेंबरचा
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाढदिवशी विमातळाचे उद्घाटन करण्याचा मुहूर्त हुकणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, पनवेलचे प्रशांत ठाकूर, उरणचे महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या समवेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, तसेच अदानी समूहाचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. अदानी समूहातर्फे जीत अदानी हे देखील पाहणीवेळी उपस्थित होते. कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी संवाद साधला.
सध्या विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे १३,००० कामगार कार्यरत आहेत. विमानतळाच्या बांधकामाशी संबंधित सर्व पर्यावरणीय परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या आहेत. मात्र, व्यावसायिक परवानग्या मिळवण्यासाठी भौतिक कामांची पूर्णता आवश्यक आहे. त्यामुळे
कोणतेही अडथळे न ठेवता काम वेळेत पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
नामकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा
विमानतळाचे सध्या ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास आहे. दरम्यान, विमानतळास दि. बा. पाटील यांच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला आहे. विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास आहे. तरीही यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
शहरातच चेक इन व्यवस्था
देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ दोन स्वतंत्र रनवेसह उभारले जात आहे. या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता आहे. ही क्षमता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत अनेक पटीने अधिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे ३७ मेगावॅट विजेच्या वापरासह संपूर्ण परिसरात इलेक्ट्रिक वाहने वापरण्यावर भर दिला जाणार आहे. टर्मिनल ते टर्मिनल जाण्यासाठी भूमिगत मेट्रो, प्रवाशांसाठी ट्रॅव्हलर यंत्रणा आणि शहरातूनच ‘इन-सिटी चेक-इन’ यासारख्या आधुनिक सुविधांची आखणी केली जात आहे. त्याशिवाय विमानतळाला जोडण्यासाठी बहुआयामी वाहतूक योजना तयार केली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.