Navi Mumbai Airport: दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:50 IST2025-11-19T10:48:30+5:302025-11-19T10:50:06+5:30
Navi Mumbai Airport News: दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. २५ डिसेंबर अर्थात नाताळाच्या मुहूर्तावर इंडिगोचे पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे.

Navi Mumbai Airport: दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. २५ डिसेंबर अर्थात नाताळाच्या मुहूर्तावर इंडिगोचे पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. सुरुवातीला सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या वेळेत विमानतळाचे संचालन केले जाणार आहे. त्याद्वारे दररोज २३ विमाने उड्डाण घेतील. विशेष म्हणजे विमानतळाच्या सुनियोजित संचलनासाठी एक विशेष मंच स्थापन करण्यात आला आहे. सुव्यवस्थित शुभारंभासाठी विमानतळावर सुरक्षा यंत्रणा, एअरलाईन्स आणि इतर भागधारकांच्या सहभागातून व्यापक ऑपरेशनल रेडिनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर (ओआरएटी) चाचण्या घेण्यात आल्या आहेत. विमानतळाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सीआयएसएफचा ताफा औपचारिकरित्या तैनात करण्यात आला आहे.
फेब्रुवारीपासून २४x७ सुरू
फेब्रुवारी २०२६ पासून विमानतळ आठवड्यातून ७ दिवस २४ तास कार्यरत राहील आणि दररोजच्या उड्डाणांची संख्या वाढून ३४ वर पोहोचेल. सुरुवातीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दर तासाला सुमारे १० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स हाताळणार आहे.
२५ डिसेंबरला सकाळी ८ वाजता बेंगळुरूहून येणाऱ्या इंडिगो (6E460) या विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी ८.४० वाजता इंडिगो (6E882) विमान हैदराबादसाठी उड्डाण घेईल, जी विमानतळावरील पहिली निर्गमन सेवा असेल. लाँच फेजमध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि अकासा एअर यांच्या उड्डाणांमुळे प्रवाशांना मुंबई आणि देशभरातील १६ प्रमुख गंतव्यांशी सुलभ कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.