Municipal protection to private schools in the city | शहरात खासगी शाळांना महापालिकेचे अभय

शहरात खासगी शाळांना महापालिकेचे अभय

ठळक मुद्देकोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यानुसार सामाजिक अंतर न राखणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लहान मुलांचे वर्ग भरवण्यास बंदी असतानाही शहरात अनेक ठिकाणी लहान मुलांच्या शाळा भरत आहेत. या खासगी शाळांवर कारवाईकडे पालिका कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनावाढीला अशा शाळा कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. 

कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यानुसार सामाजिक अंतर न राखणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे; परंतु खासगी शाळांना कारवाईतून वगळून लहान मुलांच्या जीविताशी खेळ केला जात असल्याचेही पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणी खासगी शाळांमध्ये लहान मुलांचे वर्ग भरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मोठ्या शाळा बंद असल्याने आपल्या शाळा सुरू ठेवून प्रवेश वाढविण्याचे काम सुरू आहे. असाच प्रकार कोपरखैरणे येथील एका शाळेच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. रो हाऊसमध्ये चालणाऱ्या या शाळेच्या चालकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवत वर्ग भरविले जात आहेत. त्याठिकाणी दाटीने मुले बसवली जात आहेत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांनादेखील काही व्यक्तींनी कल्पना दिलेली आहे. त्यानंतरही शाळा सुरूच असल्याचे दिसते आहे. 

Web Title: Municipal protection to private schools in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.