नवी मुंबईत किरकोळ कारणांवरून वारंवार हाेताहेत जीवघेणे हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:55 IST2025-10-09T10:55:01+5:302025-10-09T10:55:18+5:30
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडील एका अपहरण प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

नवी मुंबईत किरकोळ कारणांवरून वारंवार हाेताहेत जीवघेणे हल्ले
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सराईत गुन्हेगारांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान असतानाच अनपेक्षितपणे घडणारे गुन्हेही पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत. एखाद्या किरकोळ प्रसंगातदेखील अपहरण, वार असे प्रकार घडत आहेत. सर्वसामान्य व्यक्तीही अशा प्रसंगात अडकून कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवूनच बाहेर पडणे योग्य, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे आई-वडील एका अपहरण प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ऐरोलीत झालेल्या किरकोळ अपघातावेळी दीपक खेडकर यांनी कारच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी ट्रकचालकाचे अपहरण करून त्याला पुण्याला नेले होते. यावरून रस्त्यांवर अनपेक्षित घडणाऱ्या घटनांना कशा प्रकारे गुन्हेगारी वळण लागत आहे, याचेही दर्शन घडत आहे. रस्त्यांवर होणारे वाद मुंबई, नवी मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. वाहतूककोंडी, बेशिस्त चालक, सिग्नल तोडण्याची घाई यामध्ये सतत वाद होतच असतात.
हॉर्न वाजवल्याने चाकूहल्ला
वाशीतील ब्ल्यू डायमंड चौकात यापूर्वी सिग्नलवर उभ्या दुचाकीस्वाराला पाठीमागून आलेल्या दुचाकीने हॉर्न वाजवून हटण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून एकाला चाकूने भोकसल्याची घटना घडली होती. मागील चार वर्षांत अशा प्रकारे हाणामारी, हल्ल्याच्या सहा सात घटना नवी मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग
वाहनाला वाहन घासल्याने शिवीगाळ, मारहाण यावरून येणाऱ्या तक्रारीचेही प्रमाण अधिक आहे. दोनच दिवसांपूर्वी एका महिलेच्या कारला दुसऱ्या कारने धडक दिल्याने महिलेने कारमधील व्यक्तींना जाब विचारला असता त्यांनी थेट महिलेचा विनयभंगच केल्याचा प्रकारही घडला.
घराबाहेर निघणाऱ्या बहुतांश व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक तणावात असतात. त्यात रस्त्यांवरील परिस्थितीमुळे त्यांचा पारा अधिक चढून असे प्रकार घडत आहेत. परिणामी अशा व्यक्तींवरही गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावरही गुन्हेगारीचा ठपका बसत आहे.