Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 10:05 IST2025-11-21T10:04:10+5:302025-11-21T10:05:49+5:30
Navi Mumbai Cyber Cell: महापे येथे सुरु असलेल्या कॉलसेंटरमधून दिवसा भारतीयांवर तर रात्री अमेरिकेतल्या नागरिकांवर सायबर हल्ला करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
नवी मुंबई: महापे येथे सुरु असलेल्या कॉलसेंटरमधून दिवसा भारतीयांवर तर रात्री अमेरिकेतल्या नागरिकांवर सायबर हल्ला करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आरोपी नागरिकांच्या संगणक, लॅपटॉपमध्ये आधी स्वतःच बिघाड करून संपर्कासाठी नंबर द्यायचे. त्यावर तक्रार प्राप्त होताच बिघाड दुरुस्त करून त्याच्या मोबदल्यात पैसे घेतले जात होते.
ऑनलाइन ट्रेडिंगच्या आडून भारतीयांच्या खिशाला कात्री लावणारे कॉल सेंटर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने उघड केले. तिथल्या कामकाजाची पोलिस माहिती घेत असताना दिवसा भारतीयांना तर रात्री अमेरिकन नागरिकांना फसवले जात असल्याचे उघड झाले. दिवसा ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीला भाग पाडण्यासाठी भारतभर फोन, मॅसेज केले जायचे, तर रात्री अमेरिकन वेळेनुसार अमेरिकेतल्या नागरिकांच्या लॅपटॉप, संगणक यांच्यावर सायबर हल्ला करून ते बंद पाडले जायचे. त्याशिवाय झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी हेल्पलाइन नंबरही स्क्रीनवर सोडला जायचा. संबंधित नंबरवर अमेरिकन नागरिकांनी संपर्क साधताच स्वतःला मायक्रोसॉफ्ट कर्मचारी भासवून त्यांच्या लॅपटॉप, संगणकमधला बिघाड दुरुस्त करण्याचे पैसे घेतले जायचे. त्यामुळे महापेतील या कॉल सेंटरमुळे देश-विदेशातील गुन्हेगारीचे कॉल सेंटर उद्ध्वस्त झाले आहे.
६१ बँक खात्यांचा वापर
वेल्थ ग्रोथ, कॅपिटल सर्व्हिस, सिग्मा, ट्रेंड नॉलेज, स्टॉक व्हिजन या नावाने कंपन्या स्थापन करून हे कॉल सेंटर चालवले जात होते. गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले होते. गुन्ह्यात वापरलेल्या ७१ बँक खात्यांची माहिती उघड झाली असून, त्यापैकी ६१ खात्यात १२ कोटी २९ लाखांचा व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. खात्यांविरोधात एनसीसीआरपी पोर्टलवर ३१ तक्रारी मिळाल्या.
२० जणांना अटक, 'महाराष्ट्र सायबर' शेजारीच गुन्हेगारांचा अड्डा
नवी मुंबई महापे येथे महाराष्ट्र सायबरच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच हे कॉल सेंटर चालत होते. नवी मुंबई सायबर पोलिसांना त्याची खबर मिळताच छापा टाकून कारवाई केली. त्याठिकाणी ९७ कामगार मिळून आले असून, त्यापैकी २० जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतून नफ्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. अशा गुन्ह्यांच्या मुळाशी पोहचण्याच्या सूचना आयुक्त मिलिंद भारंबे, अपर आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सायबर सेलला केल्या होत्या. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक विशाल पाटील यांच्या पथकाने तांत्रिक तपासावर भर दिला. ट्रेडिंगचे मेसेज, बँक खात्यांची हाताळणी करणारे आदींची साखळी जोडण्याचा प्रयत्न झाला. त्यातून महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये एक वर्षांपासून चालणाऱ्या कॉल सेंटरचा भांडाफोड झाला. या कारवाईमुळे देश विदेशातील अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.
हालचालींवर पाळत
कॉल सेंटरमधील हालचालींवर पाळत ठेवल्यानंतर मंगळवारी रात्री छापा टाकला. सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धडक दिली.