मनधरणी करायला गावावरून आला, वाद मिटवत नसल्याने संतापला अन्.. चाकूने वार करुन पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 21:11 IST2025-09-30T21:11:04+5:302025-09-30T21:11:15+5:30
नवी मुंबईत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचे निर्घृणपणे हत्या केल्याची घटन घडल्याने खळबळ उडाली आहे.

मनधरणी करायला गावावरून आला, वाद मिटवत नसल्याने संतापला अन्.. चाकूने वार करुन पत्नीची हत्या
Navi Mumbai Crime : कौटुंबिक वादातून वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची मनधरणी करायला बुलढाण्यावरून आलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या करावे गावात घडली. मागील काही दिवसांपासून तो पत्नीला गावाकडे सोबत चलण्याचा हट्ट करीत होता. मात्र, काही केल्या त्यांच्यातील वाद मिटत नसल्याने त्याने चाकूने वार केले. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे.
ज्योती काकडे (वय ३५) ही महिला त्या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून दोन मुलांसह राहायला होती. तिचे पती राजू काकडे (४५) याच्यासोबत जमत नसल्याने त्या ठिकाणी ती पतीपासून वेगळी मुलांसह राहत होती. यापूर्वी पती-पत्नी व मुले पुण्याला राहायला होते. मात्र, त्या ठिकाणी दोघांमध्ये सुरू असलेल्या वादातून पत्नी करावे येथे राहायला आली होती, तर पती राजू हा बुलडाणा येथील देवळगाव या मूळगावी निघून गेला होता. दहा दिवसांपूर्वी तो पत्नीची मनभरणी करण्यासाठी करावे येथे पत्नीकडे आला होता. यादरम्यान, तो पत्नीची समजूत काढून सोबत गावाकडे चलण्याचा आग्रह करीत होता. परंतु, पत्नीने सोबत येण्यास नकार दिला होता. राजूला दारूचे व्यसन होते व त्यातून दोघांमध्ये वाद व्हायचे असे समजते.
रविवारी पुन्हा दोघांमध्ये जोराचे भांडण झाले असता राजूने स्वयंपाक घरातील चाकूने पत्नी ज्योती यांच्या संपूर्ण शरीरावर वार केले. यावेळी जखमी ज्योतीच्या किंचाळ्या ऐकून शेजारीच राहणाऱ्या नातेवाइकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याच्यावर राजू काकडे एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले.