नवी मुंबई - एपीएमसी येथील मसाला मार्केटलगतच्या नाल्यामध्ये मानवी सांगाडा आढळला आहे. पालिकेच्या वतीने ठेकेदारामार्फत नालेसफाईचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. मात्र, हा सांगाडा महिला की पुरुषाचा याचा उलगडा झालेला नसल्याने एपीएमसी पोलीस तपास करत आहेत.पालिकेच्या वतीने शहरात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरू आहेत. त्यानुसार एपीएमसीमधील ट्रक टर्मिनललगत मसाला मार्केटच्या प्रवेशद्वारालगतच्या बंदिस्त नाल्याचे सफाई काम सुरू होते. यावेळी नाल्यातील गाळ काढताना त्यामध्ये मानवी सांगाड्याचे अवशेष आढळून आले. सफाई कामगारांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली असता, कामगारांच्या मदतीने नाल्यातून पूर्ण सांगाडा बाहेर काढण्यात आला. या सांगाड्यासोबत कुजलेल्या कपड्याचे काही तुकडे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. हा मृतदेह बंदिस्त नाल्यात अनेक महिन्यांपासून पडून राहिल्याने त्याचा केवळ सांगाडा शिल्लक राहिलेला आहे. तर पाण्यामुळे अंगावरील कपडे देखील कुजल्याने त्याचे काही तुकडे मृतदेहासोबत आढळले आहेत. यामुळे सदर मृतदेह महिलेचा की पुरुषाचा याचा उलगडा होऊ शकलेला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी सांगितले. त्याकरिता हा मानवी सांगाडा तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ट्रक टर्मिनलमध्ये वाहन पार्किंगचे शुल्क वाचवण्यासाठी चालकांकडून एपीएमसी आवारातच रस्त्यावर ट्रक, टेंपो उभे केले जातात. त्याचा आडोसा घेऊन अज्ञाताने हा मृतदेह बंदिस्त नाल्यात टाकल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मृतदेहाचा केवळ सांगाडा शिल्लक असल्याने हा मृतदेह अनेक महिन्यांपूर्वी त्याठिकाणी टाकलेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सांगाड्याच्या वैद्यकीय अहवालानंतर पुढील तपासाला योग्य दिशा मिळेल अशी शक्यता देखील वरिष्ठ निरीक्षक गलांडे यांनी वर्तवली आहे.
बंदिस्त नाल्यात मानवी सांगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:57 IST