वैभव गायकर
पनवेल: पनवेल मध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात नवीन पनवेल एस 1 या भागातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना पालिकेने दि.19 रोजी आंबेड़कर सांस्कृतिक केंद्रात हलवण्यात आले होते. या रहिवाशांना दि.20 रोजी पालिकेच्या वतीने नाष्टा देण्यात आला त्यावेळी त्या नाश्त्यात आळ्या असल्याची बाब काही रहिवाशांच्या लक्षात आली.
बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पालिकेत वर्षांनुवर्षे खाद्यपदार्थ पुरविणारा मैत्री कँटरर्स नावाच्या ठेकेदाराच्या कामगारांनी उपमा दिला होता. काही नागरिकांनी हा उपमा खाला परंतू काही पुरूषांनी उपमा खात असताना उपमामध्ये आळ्या असल्याचे आढळले. जेवण पुरविणाऱ्या कामगारांकडे तक्रार केल्यानंतर यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू केला. परंतू रिपाईचे पनवेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत जाब विचारला.
काही नागरिकांनी हे अन्न खावून त्रास देखील झाला. उपायुक्त रविकिरण घोडके यांनी घटनास्थळी धाव घेवून या प्रकाराची चौकशी केली. कंत्राटदार मैत्री कँटरर्सचे मालक प्रितम म्हात्रे यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारण्यात आला. रिपाईच्या नेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अन्नाच्या दर्जांची तपासणी करण्यात आली. तसेच अतिवृष्टीग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालिकेने आंबेड़कर सांस्कृतिक केंद्रात डॉक्टरांचे पथक नेमले आहे.