पनवेलमधील सैन्य भरतीतील उमेदवारांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:33 IST2018-10-06T04:32:37+5:302018-10-06T04:33:03+5:30
आॅक्टोबर हिटचाही फटका : पाणी, प्रसाधनगृहांचीही कमतरता; जीव मुठीत घेऊन काढावी लागते रात्र

पनवेलमधील सैन्य भरतीतील उमेदवारांची गैरसोय
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथे ४ ते १३ आॅक्टोबर दरम्यान सैन्य भरती सुरू आहे, याकरिता दररोज पाच हजार उमेदवार येत आहेत. त्या तुलनेत या ठिकाणच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयाची कमरता असल्याने तरुणांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आॅक्टोबर हिट असल्याने, मिळेल त्या सावलीत बसून दिवस काढावा लागत आहे.
शासकीय नोकरी मिळणे, आजमितीला दुरापस्त झाले आहे. कित्येक तरुण, करेन तर सरकारी नोकरीच करेन, नाही तर घरी बसेन, अशी भूमिका घेतात. त्यामुळे पोलीस आणि सैन्यातील भरती होऊन स्वप्नपूर्ती करण्याची संधी राहते. त्याकरिता हजारो तरुण भरतीत उतरतात, त्यातील त्यात सैन्यात दरवर्षी अनेक जागा निघतात, रिक्त होतात. त्याचबरोबर समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी नोकरी असल्याने याकडे आजही तरुणांचा कल दिसून येतो. गुरुवारपासून कर्नाळा अकादमीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील उमेदवारांकरिता सैन्यभरती सुरू झाली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील हजारो तरुण पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. पहाटे भरती प्रक्रि या सुरू होते. मात्र, तोपर्यंत उमेदवारांना अकादमीच्या बाहेरच रात्र काढावी लागत आहे. ठाणा नाका ते एनएच-४ बीला जोडणाºया रस्त्यावर भरतीकरिता आलेले तरुण झोपतात.
उमेदवारांसाठी फक्त सहा मोबाइल टॉयलेटची सोय करण्यात आलेली आहे. पाच हजारांकरिता ही संख्या अपुरी असल्याने त्या ठिकाणी रांगा लागत आहेत, त्यामुळे उमेदवारांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या व्यतिरिक्त बाहेर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मिनरल वॉटर विकत घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर रोडच्या दोन्ही बाजूला गवत वाढलेले आहे. तिथे स्वच्छता नसल्याने जीव मुठीत धरून झोपावे लागत आहे. आॅक्टोबर हिट असल्याने उकाडा जास्त आहे, त्यामुळे दिवसभर विसाव्याकरिता झाडे किंवा दुकानांच्या शेडचा आश्रय घ्यावा लागत आहे.
बाहेर सहा टॉयलेट ठेवण्यात आलेले आहेत आणि पाच हजार युवक आले आहेत. त्यांना ते कसे पुरतील, त्यामुळे खूप गैरसोय झाली. याबाबत प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, दोन दिवसांत तसे काही आढळले नाही. आम्हाला या गैरसोयींचा सामना करण्याशिवाय पर्याय नाही.
- सचिन पाटील, मालेगाव
शौचालयाबरोबर पिण्याकरिता पाण्याची सोय नसल्याने आम्हाला तहान भागविण्याकरिता वणवण करावी लागली. मिनरल वॉटर घेऊन पाणी प्यावे लागत आहे. दोन दिवसांत अनेक बाटल्या विकत घ्याव्या लागल्या, त्याचाही भुर्दंड बसला. शेवटी आम्हाला सैन्यात भरती व्हायचे असल्याने गरजवंतांना अक्कल नसते.
- दीपक सुळे, सटाना