नवी मुंबईत गुन्ह्यांचा आलेख निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 12:15 AM2020-06-10T00:15:40+5:302020-06-10T00:15:50+5:30

लॉकडाऊनचा काळ ठरला फायदेशीर : पाच महिन्यांत ७४३ गुन्ह्यांची नोंद; चोरीच्या गुन्ह्यांत घट

Crime in Navi Mumbai halves | नवी मुंबईत गुन्ह्यांचा आलेख निम्म्यावर

नवी मुंबईत गुन्ह्यांचा आलेख निम्म्यावर

Next

सूर्यकांत वाघमारे।

नवी मुंबई : कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊन शहरातील गुन्हेगारीत घट होण्यास प्रभावशाली ठरला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त व नागरिक घरातच बंदिस्त राहिल्याने गुन्हेगारांना संधी मिळालेली नाही. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत पाच महिन्यांत गुन्ह्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.

शहरात वाहनचोरी, सोनसाखळी चोरी तसेच घरफोडी हे गुन्हे नेहमीचेच झाले आहेत. दाट लोकवस्ती व आडोशाच्या जागा असलेल्या ठिकाणी चोरट्यांना लपायची संधी मिळत असल्याने अशा ठिकाणी सर्वाधिक चोऱ्या घडत आहेत. त्यावर पोलिसांकडून अनेक उपाययोजना राबवूनही गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अखेर कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील गुन्हेगारी बºयाच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. त्यात चोरी, घरफोडी अशा मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांसह इतरही गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
गतवर्षी मेअखेरपर्यंत परिमंडळ एकमध्ये १०९० गुन्हे घडले होते. त्यामध्ये मालमत्तेशी संबंधित ५२३ गुन्ह्यांचा समावेश होता. तर महिला अत्याचार व छळवणुकीचे १३९ गुन्हे घडले होते. परंतु चालू वर्षात मेअखेरपर्यंत ७४३ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये मालमत्तेविषयीचे ३४४ तर महिलांविषयीचे ९९ गुन्हे आहेत. यापैकी बहुतांश गुन्हे जानेवारी ते मार्च महिन्याच्या कालावधीतलेच आहेत. त्यानंतर अद्यापपर्यंत शहरात लॉकडाऊनमुळे पोलिसांची गस्त व आवश्यक ठिकाणी बंदोबस्त असल्याने गुन्ह्यांना आळा बसला आहे.
मध्यंतरीच्या काळात लॉकडाऊन असतानादेखील रात्रीच्या वेळी काही ठिकाणी चोरट्यांकडून गुन्ह्याच्या उद्देशाने टेहळणी सुरू असल्याचेही प्रकार समोर आले होते. परंतु तुरळक घटना वगळता चोरी अथवा घरफोडीच्या अधिक घटना घडल्या नाहीत.

चालू वर्षात मेअखेर पर्यंत एकूण ७४३ गुन्हे घडले आहेत. गतवर्षी याच पाच महिन्यात १,०९० गुन्हे घडले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लॉकडाऊन दरम्यानचा बंदोबस्त व इतर कारणांनी गुन्ह्यात घट झाली आहे.
- पंकज डहाणे,
उपायुक्त - परिमंडळ १
 

Web Title: Crime in Navi Mumbai halves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.