नगरसेवकाचा शिवसैनिकावर हल्ला

By Admin | Updated: October 29, 2015 23:51 IST2015-10-29T23:51:11+5:302015-10-29T23:51:11+5:30

राजकीय वादातून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. जखमीवर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Corporator attacked Shivsainika | नगरसेवकाचा शिवसैनिकावर हल्ला

नगरसेवकाचा शिवसैनिकावर हल्ला

नवी मुंबई : राजकीय वादातून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. जखमीवर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह दोघांना अटक केली आहे.
मकरंद म्हात्रे असे जखमी युवा सेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी कुकशेत गाव येथे त्याच्यावर चॉपर व रॉडने हल्ला केला. त्याच परिसरात राहणाऱ्या ६ ते ७ तरुणांनी केलेल्या हल्ल्यात मकरंद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाशीच्या फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या पायाला व शरिरावर इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर झालेला हल्ला राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सूरज पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी केल्याची तक्रार मकरंद याने पोलिसांना केली आहे. त्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्यात नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह संदीप पाटील, दीपक पाटील, प्रवीण पाटील, अरविंद पाटील, नृपेश पाटील, निशांत पाटील व इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी सूरज पाटील व त्यांचा एक साथीदार अशा दोघांना अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी म्हात्रे याने कुकशेत गावात आमदार मंदा म्हात्रे यांचे लावलेले होर्डिंग अज्ञाताने फाडले होते. तर तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घराच्या आवारातील कौटुंबिक मंदिरावर देखील सिडको व पालिकेची संयुक्त कारवाई झालेली. यावरून म्हात्रे याने सदर प्रकारांचा निषेध सोशल मीडियावर व्यक्त केला होता. यामध्ये त्याने नगरसेवकालाही दोषी धरले होते. यामुळे आपल्यावर हल्ला झाल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे दिवसभर कुकशेत परिसरात तणावाचे वातावरण होते. तर घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये याकरिता परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. नगरसेवक सूरज पाटील यांच्यावर कारवाईला पोलीस विलंब करत असल्याच्या संशयाने मकरंद म्हात्रेच्या समर्थकांनी नेरुळ पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमवला होता. तर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रात्री नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
याप्रकरणी नगरसेवक सूरज पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Corporator attacked Shivsainika