परिमंडळ दोनसाठी उपायुक्तांमध्ये रस्सीखेच
By Admin | Updated: May 30, 2017 06:22 IST2017-05-30T06:22:41+5:302017-05-30T06:22:41+5:30
परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पदावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे विद्यमान उपायुक्तांना सहा महिन्यांपूर्वी

परिमंडळ दोनसाठी उपायुक्तांमध्ये रस्सीखेच
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पदावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामुळे विद्यमान उपायुक्तांना सहा महिन्यांपूर्वी मिळालेली खुर्ची टिकवण्यासाठी कॅटमध्ये धाव घ्यावी लागली आहे. मुख्यालयासाठी बदली होवून आलेल्या उपायुक्तांनी शासनाकडून परिमंडळ दोनसाठी बदलीचे नवे आदेश आणल्यामुळे ही तेढ निर्माण झाली आहे.
शासनाने एप्रिल महिन्याच्या अखेरीस केलेल्या उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातून दोन अधिकाऱ्यांची मुंबईत बदली झालेली आहे. त्याचवेळी शासनाने कोल्हापूर येथून आर. बनसोडे तर मुंबईतून प्रवीण पवार यांची नवी मुंबई आयुक्तालयात बदली केली आहे. त्यापैकी पवार यांचे बदली आदेश काढतानाच शासनाने त्यांची मुख्यालयाच्या उपायुक्त पदासाठी नियुक्ती केलेली होती. मात्र यानंतर काही दिवसातच पहिल्या आदेशात बदल करून शासनाने त्यांचे परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदासाठी नवे बदली आदेश काढले आहेत. या नव्या बदली आदेशासाठी पवार यांनी जंग पछाडल्याची चर्चा आहे. परंतु पवार यांच्या सुधारित बदली आदेशाला परिमंडळ दोनचे विद्यमान उपायुक्त राजेंद्र माने यांनी कॅटमध्ये आव्हान दिले आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. डिसेंबर २०१६ मध्ये परिमंडळ दोनचे तत्कालीन उपायुक्त विश्वास पांढरे यांची बदली झाल्यानंतर राजेंद्र माने यांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यापूर्वी ते मुख्यालय उपायुक्त पदावरच कार्यरत होते. यामुळे अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा मुख्यालयाचा कार्यभार घेण्यास त्यांनी नकार दर्शवला आहे. शिवाय परिमंडळ दोनचा कार्यभार सांभाळल्यापासून त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे.
उपायुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वी देखील नवी मुंबई आयुक्तालयात परिमंडळ दोनचे उपायुक्त पद भूषवलेले आहे. सन २००५ ते २००८ पर्यंत ते नवी मुंबई आयुक्तालयात कार्यरत होते. त्यानंतर ९ वर्षांनी ते पुन्हा नवी मुंबईत बदली होवून आले आहेत. यामुळे एकदा बदली होवून गेल्यानंतरही पुन्हा त्याच आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांची बदली होतेच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतरही त्यांच्याकडून परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदासाठीच प्रयत्न झाल्याने बदली प्रकरण वादग्रस्त ठरत आहे. वर्षभरापूर्वी काही सहायक आयुक्तांनी देखील परिमंडळ दोनच मिळावे यासाठी मंत्रालयात जोरदार वशिलेबाजी चालवली होती. त्यामुळे परिमंडळ दोनमध्ये नेमकं दडलंय काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.