मृत व्यक्तीला जिवंत दाखवून सिडकोचा भूखंड हडपला; भाजपच्या माजी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 19:02 IST2025-12-04T19:01:22+5:302025-12-04T19:02:13+5:30
सिडकोच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भाजपचे माजी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून सिडकोचा भूखंड हडपला; भाजपच्या माजी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा दाखल
Panvel CIDCO Land Scam: मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे कामोठे येथील ११०० चौरस मीटरचा सिडकोचा मौल्यवान भूखंड हडपल्याचा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिडकोने केलेल्या तक्रारीवरून भाजपचे माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्यासह एकूण १२ जणांवर पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नेमके प्रकरण काय?
पनवेलमधील तक्का गावातील रहिवासी विष्णू बहिरा यांचे निधन झाले होते. सिडकोने त्यांच्या मालकीची जमीन संपादित केली होती आणि नियमानुसार या जमिनीच्या मोबदल्यात विष्णू बहिरा यांच्या वारसांना कामोठे येथे भूखंड मिळणे अपेक्षित होते. मात्र, जमिनीचा मोबदला म्हणून सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडासाठी बहिरा कुटुंबातील सदस्यांनी संगनमत करून मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
आरोपींनी मृत विष्णू बहिरा यांचे ओळखपत्र तयार केले. या ओळखपत्रावर मृत विष्णू बहिरा यांच्याऐवजी सखाराम ढवळे नावाच्या व्यक्तीचा फोटो लावण्यात आला. सखाराम ढवळे यांनाच विष्णू बहिरा असल्याचे भासवून, त्यांच्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे भूखंड मिळवण्याचा हा संपूर्ण घोटाळा करण्यात आला.
२००६ पासून कागदपत्रांचा वापर
सिडकोच्या चौकशीत हा घोटाळा उघडकीस आला. आरोपींनी २००६ पासून विविध सरकारी आणि सिडको कार्यालयांमध्ये या बनावट कागदपत्रांचा वापर केला. या घोटाळ्यासाठी मृत विष्णू बहिरा म्हणून सखाराम ढवळे हे पनवेल तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, तसेच सिडकोच्या विविध कार्यालयांत वारंवार उपस्थित राहिले. भाडेपट्टा करारनामा आणि त्रिपक्षीय करार करण्याच्या वेळीही ढवळे हा विष्णू बहिरा म्हणून उपस्थित होता.
भाजपच्या माजी नगरसेवकावर कारवाई
या प्रकरणी सिडकोने पनवेल शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार २ डिसेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे, त्यात भाजपचे माजी नगरसेवक सुनील बहिरा यांचा समावेश आहे. सुनील बहिरा यांनी काही दिवसांपूर्वीच शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या १२ हजार चौरस फूट जमिनीच्या गंभीर फसवणूक प्रकरणात आता पोलीस पुढील तपास करत असून, बनावट कागदपत्रे तयार करण्यात आणि सिडकोच्या भूखंडाची फसवणूक करण्यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.