सोशल मीडियामुळे सापडला चिमुरडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 23:11 IST2019-11-14T23:10:58+5:302019-11-14T23:11:04+5:30
घरचा पत्ता न सापडल्यामुळे एक चिमुरडा घणसोली गावातील गुणाले तलावाजवळ रडत होता.

सोशल मीडियामुळे सापडला चिमुरडा
नवी मुंबई : घरचा पत्ता न सापडल्यामुळे एक चिमुरडा घणसोली गावातील गुणाले तलावाजवळ रडत होता. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून एका युवकाने त्याची विचारपूस केली आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर तब्बल सात तासांनी पालकांच्या ताब्यात मुलाला सुखरूप सुपूर्द करण्यात आले. माणुसकीचे दर्शन घडविणारी ही घटना गुरुवारी घणसोलीत घडली.
शिवम कुमार (५), असे सापडलेल्या मुलाचे नाव आहे. घणसोलीतील शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत पाटील सकाळी गुणाले तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असताना एक मुलगा तेथे रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या वेळी त्याची चौकशी केली असता त्याला घरचा पत्ता सांगता येत नव्हता. पाटील मुलाला घरी घेऊन आले. त्याला खाऊ दिले. अनेक तास उलटूनही मुलाचे पालक सापडत नसल्यामुळे रबाळे पोलीस ठाण्यात पाटील यांनी संपर्कही साधला. त्यानंतरही पालक सापडेना, दुपारी १ वाजताच्या सुमारास त्याला दुचाकीवरून घणसोली, नोसिल नाका आणि झोपडपट्टी परिसरात फिरवून आणले. तरीही यश मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि काही तासांतच मुलाचे पालक मुलाला घेण्यासाठी पाटील यांच्याकडे आले.