बोर्ली-मांडला : महाड सावित्री नदीवरील पुलाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुरुड, रोहा आणि अलिबाग या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या साळाव खाडी पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपअधीक्षक ( गृह ) राजेंद्र दंडाळे यांनी दिले आहेत. त्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना रोहा-कोलाडमार्गे वडखळ या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामहामार्गावरील सावित्री नदीवर असणारा ब्रिटिशकालीन पूल मधोमध पडल्याने अनेक निष्पाप जीव मृत्युमुखी पडले होते, तसेच दोन एसटी बससहित इतर छोटी वाहने त्या नदीच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्याची पुनरावृत्ती परत मुरु ड, रोहा आणि अलिबाग या तीन तालुक्यांना एकत्रित जोडणाऱ्या साळाव खाडी पुलाची होऊ नये या उद्देशाने त्या पुलावरील वाहनांची होणारी वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी अनेक नागरिकांनी या पूर्वी सुद्धा शासनाच्या विविध कार्यालयाकडे तसेच शांतता समितीच्या बैठकीत केली होती. साळाव-रेवदंडा खाडी पुलाला तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेला आहे. या पुलाला सानेगाव येथे असणाऱ्या इंडो एनर्जी या जेट्टीवर दगडी कोळशाच्या बार्जने दोन तीन वेळा धडक दिली आहे, तसेच रेवदंडा खाडीकिनारी असणाऱ्या आलं मुर्तुझा यारिकाम्या बार्जने सुद्धा धडक मारली होती. यामुळे या पुलाच्या काही भागाचा स्लॅब पडला आहे. या खाडीपुलावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरी साळाव येथे असणाऱ्या जेएसडब्लू या कंपनीत माल घेऊन जाणारी अवजड वाहने या पुलाचा वापर करीत असतात. पोलीस उपअधीक्षक ( गृह ) तथा अलिबाग-मुरुडचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र दंडाळे रात्रीची गस्त घालत असताना साळाव पुलावरून जेएसडब्लू या कंपनीतून माल घेऊन जाणारे ट्रक दिसले असता त्यांनी ते अडवून साळाव तपासणी नाक्यावर उभे केले आहेत. (वार्ताहर)
साळाव खाडी पुलावरून अवजड वाहनांना बंदी
By admin | Updated: October 6, 2016 03:33 IST