कोपरखैरणेमध्ये वाढतोय अतिक्रमणाचा भस्मासुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:12 AM2020-01-05T01:12:48+5:302020-01-05T01:12:54+5:30

कोपरखैरणेमधील माथाडी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत.

Bhasmasur is encroaching on the corner | कोपरखैरणेमध्ये वाढतोय अतिक्रमणाचा भस्मासुर

कोपरखैरणेमध्ये वाढतोय अतिक्रमणाचा भस्मासुर

Next

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : कोपरखैरणेमधील माथाडी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत. कोणतीही परवानगी न घेता चार मजल्यांचे बांधकाम केले जात आहे. यामध्ये अनेक रॅकेट सक्रिय आहेत. तब्बल ३,९७३ पेक्षा जास्त बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र आहे. नियम धाब्यावर बसवून केलेल्या बांधकामांमुळे सार्वजनिक सुविधांवर ताण येऊ लागला आहे.
कोपरखैरणे सेक्टर ६ मधील रूम नंबर ९१६ चे अनधिकृतपणे बांधकाम सुरू होेते. महापालिका प्रशासनाने शुक्रवारी येथील बांधकामावर कारवाई केली. वास्तविक या परिसरातील हे एकमेव बांधकाम नाही. मागील काही वर्षांमध्ये महापालिका प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींसह सर्वांनी केलेल्या दुर्लक्षामुळे व काही घटकांचे अभय असल्यामुळे माथाडी चाळींच्या जागेवर अतिक्रमणाचा भस्मासुर उभा राहिला आहे. बैठ्या चाळींच्या जागेवर दहा वर्षांपूर्वीच महापालिकेची परवानगी घेऊन तळमजला अधिक एक, असे बांधकाम करण्यास अधिकृत परवानगी देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात नियमाप्रमाणे बांधकाम सुरू झाले; परंतु बिल्डर व इतरांनी रहिवाशांना जादा बांधकाम करू देण्याचे आमिष दाखवून देण्यास सुरुवात केली, यामुळे एकच्या ऐवजी दोन व आता चार मजल्यांचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. अत्यंत कमी जागेमध्ये चार मजले उभे करण्यात आले आहेत. अनेक चाळींमध्ये ये-जा करण्यासही त्रास होऊ लागला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून ही बांधकामे करण्यात आली आहेत. महापालिकेच्या विभाग कार्यालयानेही या बांधकामांच्या विरोधात कधीच ठोस भूमिका घेतली नाही. यामुळे सद्यस्थितीमध्ये संपूर्ण कोपरखैरणे परिसर बकाल झाला आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागातून मिळालेल्या माहितीप्रमाणे कोपरखैरणेमधील विविध सेक्टरमध्ये आतापर्यंत ५,०७४ जणांना बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे. यामधील फक्त १,२०१ जणांनी नियमाप्रमाणे बांधकाम केले असून, भोगवटा प्रमाणपत्र घेतले आहे. तब्बल ३,८७३ जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. नियमाप्रमाणे बांधकाम केले नसल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. अतिक्रमण केले असल्यामुळे बांधकामधारक भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्जही दाखल करत नाहीत. सद्यस्थितीमध्ये नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येत नाही; परंतु यानंतरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अतिक्रमणाचे गंभीर परिणाम या परिसरातील रहिवाशांवर होऊ लागले आहेत. रस्ते अरुंद झाले असून, वारंवार वाहतूककोंडी होत आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधून पाण्याचा योग्यपद्धतीने निचरा होत नाही. पाणीपुरवठा यंत्रणेवर परिणाम होऊ लागला आहे. वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना जागाही उपलब्ध नाही.
।पालिका अधिकारीही जबाबदार
ंकोपरखैरणेमधील अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीही जबाबदार आहेत. जवळपास चार हजार अनधिकृत बांधकामे पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने कधीच कडक कारवाई केली नाही. अप्रत्यक्षपणे अतिक्रमणांना अभय मिळेल, अशीच भूमिका घेतली. यामुळे यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
।बिल्डरवरही कारवाई करावी
कोपरखैरणेमध्ये अनधिकृत बांधकाम करणाºयांवर काही गुन्हेही दाखल केले आहेत. वास्तविक बांधकाम करणारे ठेकेदार व बिल्डरांचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आराखडे तयार करणाºया वास्तुविशारदांची भूमिका तपासण्याचीही आवश्यकता असून, या रॅकेटमध्ये कोणी सहभागी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
।कठोर उपाययोजनांची गरज
अतिक्रमणांमुळे कोपरखैरणे परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. बैठ्या चाळींच्या जागेवर चार मजल्यांच्या चिंचोळ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. या सर्वांचा परिसरातील सार्वजनिक सुविधांवर ताण पडत आहे. मोटार लावल्याशिवाय चौथ्या मजल्यापर्यंत पाणी जात नाही, अनधिकृतपणे मोटारचा वापर केला जात आहे. रस्ते अपुरे पडत आहेत. रोडवरून चालणेही मुश्कील झाले आहे. बांधकामाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले असून भविष्यात परिस्थिती अजून गंभीर होणार आहे.
।सेक्टरनिहाय बांधकाम परवानगीचा तपशील
सेक्टर बांधकाम भोगवटा परवानगी प्रमाणपत्र
१ ११३ १००
२ ५३८ ८४
३ ३९२ ४५
४ ६०५ ७७
१० २१ १४
११ ९५ ८२
१२ ११० ८०
१३ ०६ ०३
१४ ९९ ७८
१५ ५८७ ८१
१६ ५२८ ८६
१७ ५४५ ८५
१८ ६०४ ६०
१९ २५६ २०३
२० ४१ ३४
२२ १० ०१
२३ १६ ०३
२५ ०१ ०१
२६ ०१ ०१
२७ ०२ ०१

Web Title: Bhasmasur is encroaching on the corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.