वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न; सानपाडा येथील घटना, अज्ञातांवर गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 10, 2023 17:49 IST2023-04-10T17:48:46+5:302023-04-10T17:49:13+5:30
मित्रावर वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सानपाडा येथे घडली आहे.

वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न; सानपाडा येथील घटना, अज्ञातांवर गुन्हा दाखल
नवी मुंबई : व्यवसायाची रोकड घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या मित्रावर वार करून रोकड लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सानपाडा येथे घडली आहे. घटनेवेळी दोघेजण त्याच्या मदतीला आल्याने हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
नेरुळ येथे राहणाऱ्या अनिल जयस्वाल (३२) सोबत हा प्रकार घडला आहे. तो शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास व्यापारी मित्र राजकुमार जयस्वाल याचे २ लाख रुपये घेऊन एपीएमसी मधून नेरुळकडे चालला होता. त्याची मोटरसायकल सानपाडा सेक्टर ६ येथे येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्याच्याकडील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र अनिलने त्यांना प्रतिकार केला असता दोघांपैकी एकाने त्याच्यावर चाकूने वार केले.
भररस्त्यात हा थरार सुरु असतानाच त्या मार्गाने चाललेले दोन तरुण अनिलच्या मदतीला आल्याने दोघा लुटारूंनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अनिलवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याच्या मदतीला धावलेल्या दोघांमुळे जबरी चोरी टळली असून त्याचे प्राणही वाचले आहेत. याप्रकरणी रविवारी सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.