तरुणांना अडकवतात, अत्याचार करून जबरदस्ती लिंगबदल; तृतीयपंथीय गँगची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:13 IST2025-01-09T14:10:53+5:302025-01-09T14:13:03+5:30
महाविद्यालयीने तरुणांना जाळ्यात अडकवून त्यांना तृतीयपंथी बनवणाऱ्या एका तृतीयपंथी गँगमुळे दहशत पसरली आहे.

तरुणांना अडकवतात, अत्याचार करून जबरदस्ती लिंगबदल; तृतीयपंथीय गँगची दहशत
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात... त्यानंतर त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करतात... त्यानंतर त्या तरुणांना लिंगबदल करून तृतीयपंथीय बनवले जाते... एक व्हिडीओ समोर आला आणि त्यानंतर तृतीयपंथी गँगच्या दहशतीचा प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशात एक तृतीयपंथी गँग जबरदस्तीने लिंगबदल करून तरुणांना तृतीयपंथी बनवत असल्याचे समोर आले. एका तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जबरदस्ती तृतीयपंथी बनवलेल्या एका तरुणाला काही तृतीयपंथी मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यातच एका तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन तृतीयपंथीयांची अशी गँग असल्याचे सांगितले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
उत्तर प्रदेशातील बांदामध्ये तृतीयपंथी गँगची दहशत पसरली आहे. या गँगकडून तरुणांना बळजबरीने तृतीयपंथी बनवले जात आहे.
त्या तरुणांनी घेतली पोलीस अधीक्षकांकडे धाव
या तृतीयपंथी गँगने ज्या तरुणांना लिंबबदल शस्त्रक्रिया करून तृतीयपंथी केले. त्यातील जवळपास १२ ते १३ तरुणांनी बांदाचे पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. या तरुणांनी कशा पद्धतीने त्यांना तृतीयपंथी बनवण्यात आले, याबद्दलचा सगळा घटनाक्रम सांगितला. या तरुणांनी तशी तक्रार पोलिसांत केली आहे. त्यांनी सुरक्षा देण्याची मागणी केली असून, या तृतीयपंथी गँगवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हिडीओमुळे तृतीयपंथी गँगचे फुटले बिंग
एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात एका तरुणाला नग्न करून अमानुष्यपणे मारहाण केली जात आहे. हा तरुण बिसांडा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी आहे. या तरुणाचे नाव बच्चा असे असून, तो तृतीयपंथी गँगच्या जाळ्यात अडकला होता.
त्याने तृतीयपंथी बनण्यास नकार दिल्यानंतर या गँगने त्याला मारहाण केली. हा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर ही घटना अंतरा पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे तपासातून समोर आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तरुणांना जबरदस्ती तृतीयपंथी बनवणाऱ्या गँगचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी पीडित तरुणांना दिले आहे.