महिलांचे व्हिडिओ काढून इन्स्टाग्रामवर करायचा पोस्ट;तरुणीच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:47 IST2025-07-10T17:45:19+5:302025-07-10T17:47:07+5:30

बंगळुरुत महिलांचे गुपचूपपणे व्हिडीओ आणि फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

young man was arrested for secretly taking videos and photos of women in Bengaluru and uploading them on Instagaram | महिलांचे व्हिडिओ काढून इन्स्टाग्रामवर करायचा पोस्ट;तरुणीच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश, आरोपीला अटक

महिलांचे व्हिडिओ काढून इन्स्टाग्रामवर करायचा पोस्ट;तरुणीच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश, आरोपीला अटक

Bengaluru Crime: बंगळुरूमध्ये एका २६ वर्षीय तरुणाला इन्स्टाग्रामवर महिलांचे फोटो आणि व्हिडिओ परवानगी न घेता पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव गुरदीप सिंग असे आहे, जो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवीधर आहे आणि सध्या बेरोजगार आहे. गुरदीपला बंगळुरूच्या केआर पुरम भागातील त्याच्या घरातून अटक करण्यात आली, जिथे तो त्याच्या भावासोबत राहतो. एका तरुणीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अकाउंटची माहिती दिल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही याप्रकरणाची दखल घेतली असून आपला समाज कुठे चालला आहे असा सवाल त्यांनी केला.

बंगळुरूमध्ये महिलांचे फोटो आणि रिल्स इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यावरून वाद पेटला आहे. महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अशा प्रकारचे अकाऊंट चालवल्याचा आरोप असलेल्या गुरदीप सिंगला ताब्यात घेण्यात आले आहे. २६ वर्षीय गुरदीपवर परवानगीशिवाय महिलांचे फोटो काढल्याचा आणि नंतर ते इंस्टाग्रामवर अपलोड केल्याचा आरोप आहे. गुरदीपच्या चॅनेलवरुन महिलांचे अनेक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आले. या व्हिडिओ आणि फोटोंवर महिलांनी आक्षेप घेतला. आमच्या परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडिओ का काढले गेले आणि व्हायरल का केले गेले, असा सवाल तक्रारदार महिलांनी केला आहे.

सध्या गुरदीप पोलिस कोठडीत आहे आणि या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस त्याने गे कृत्य किती वेळा केले  आणि त्यात इतर कोणी लोकांचाही सहभाग आहे का याचा तपास करत आहेत. हे व्हिडिओ आणि फोटो सेंट्रल बेंगळुरूमधील चर्च स्ट्रीटवर घेतले आहेत. बंगळुरूच्या प्रसिद्ध चर्च स्ट्रीटला दाखवण्याचा प्रयत्न करताना गुरदीपने महिलांचे फोटो आणि व्हिडिओ परवानगीशिवाय काढले. एका तरुणीचे जेव्हा इंस्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले तेव्हा तिने आक्षेप घेतला.

"हा माणूस चर्च स्ट्रीटवर फिरतो आणि म्हणतो की तो इथल्या गर्दीला दाखवत आहे. पण वास्तव असे आहे की तो इथल्या महिलांना फॉलो करतो आणि त्यांचे व्हिडिओ बनवतो. फोटो काढतो. तो हे सर्व गुपचूप करतो. शेवटी, कोणत्याही महिलेचा फोटो किंवा व्हिडिओ तिच्या परवानगीशिवाय कसा काढला जाऊ शकतो आणि सोशल मीडियावर अपलोड केला जाऊ शकतो. असे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केल्यानंतर काही लोकांनी मला सोशल मीडियावर अश्लील मेसेजही पाठवले," असे या तरुणीने सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, अशा प्रकारचे कृत्य हा गुन्हा

"सार्वजनिक ठिकाणी महिलांचे गुप्तपणे चित्रीकरण आणि छळ होत असल्याचे पाहून मला खूप वेदना होतात. असे व्हिडिओ महिलांच्या प्रतिष्ठेला धोका देऊन ऑनलाइन व्हायरल केले जातात. हे ते कर्नाटक राज्य नाही ज्याचे आम्ही समर्थन करतो. गेल्या काही दिवसांत अनेक घटना घडल्या आहेत आणि आमच्या सरकारने अटक केलेल्या गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई केली आहे. आम्ही अशा हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आपण स्वतःला विचारले पाहिजे की जर महिलांना कोणत्याही भीतीशिवाय मुक्तपणे फिरता येत नसेल तर आपला समाज कुठे चालला आहे? अशा प्रकारचे कृत्य हा गुन्हा आहे. आम्ही आमच्या राज्यातील महिलांसोबत आहोत. तुमची सुरक्षा आणि प्रतिष्ठा ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई करू. मी प्रत्येक नागरिकाला विनंती करतो की जर तुम्हाला असे व्हिडिओ किंवा अकाउंट ऑनलाइन आढळले तर कृपया १९३० वर कॉल करून किंवा http://cybercrime.gov.in वर जाऊन सायबर सेलला त्वरित कळवा. चला आपण सर्वजण मिळून कर्नाटक घडवण्यासाठी काम करूया जिथे प्रत्येक महिला सुरक्षित वाटेल," असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

Web Title: young man was arrested for secretly taking videos and photos of women in Bengaluru and uploading them on Instagaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.