"तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष’’, भाजपाचं हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:11 IST2025-09-30T18:11:03+5:302025-09-30T18:11:31+5:30
BJP News: भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

"तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष’’, भाजपाचं हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर
येत्या विजयादशमी दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार असून, त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघावर खोचक टीका केली होती. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते ते एका व्यक्तीचे नाही तर प्रवृत्तीचे दहन असते. संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असा सल्ला सपकाळ यांनी दिला होता. त्याला आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.
या संदर्भात सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणासे की, हर्षवर्धन सपकाळजी, तुम्हाला आरएसएस माहीत नाही. तो दहा तोंडाचा नव्हे, कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष आहे. एकात्म मानववाद तुम्हाला माहीत नसणारच! कॉंग्रेसचा मानववादाशी संबंधच नाही. त्यामुळे आरएसएसचा सहस्रमुखांचा समाजपुरुष तुम्हाला कळणार नाही. आरएसएसचे काम हे केवळ एखाद्या संघटनेपुरते मर्यादित नाही, तर ते राष्ट्राभिमान, संस्कृती आणि सामाजिक एकतेची ज्योत अखंडतेने प्रज्वलित ठेवणारे शंभर वर्षांचे एक वैचारिक अधिष्ठान आहे. गेल्या शंभर वर्षात तुमच्या खानदानी आणि दरबारी राजकारण्यांना तसे काम जमले नाही, असे केशव उपाध्येंनी पुढे सांगितले.
महाराष्ट्रातून नामशेष झालेल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने तर त्याची दिवास्वप्नेही पाहू नयेत. त्यामुळे संपूर्ण देशवासीयांची अशी भूमिका आहे की, जे संघावर खोटे आरोप लावतात, त्यांचे ‘खोटेपणाचे तोंड’ जाळण्याची वेळ आली आहे. जे देशविरोधी विचारांना खतपाणी घालतात, त्यांचे ‘देशद्रोहाचे तोंड’ जाळणे आवश्यक आहे. जे हिंदू संस्कृतीचा अवमान करतात, त्यांचे ‘संस्कृतीविरोधाचे तोंड’ दहन व्हायला हवे. जे समाजात फूट पाडतात, त्यांचे ‘फुटीरवादी तोंड’ दहन केले पाहिजे. तुमच्यासारख्या देशविरोधी प्रवृत्तींना हरवण्यासाठी संघाला केवळ विजयादशमीच नव्हे तर वर्षातील प्रत्येक दिवस एका उत्सवासारखा आहे. कारण संघ रावणासारख्या दहा डोक्यांनी नाही तर लाखो स्वयंसेवकांच्या एकदिलाने चालतो, असेही उपाध्ये यांनी यांनी सांगितले.