योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:30 IST2025-07-21T05:30:36+5:302025-07-21T05:30:52+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या शनिवारी रात्री झालेल्या बैठकीमुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे.

Yogi's Delhi visit and discussion on state president election; OBC face or female leader may be selected | योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड

योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड

हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या शनिवारी रात्री झालेल्या बैठकीमुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे. या अधिकृतरीत्या शिष्टाचार भेटी असल्याचे सांगितले जात असले तरी योगी यांची दिल्लीत येण्याची वेळ आणि त्यांनी एक्सवरून केलेली पंतप्रधान मोदींची जगातील सर्वांत लोकप्रिय नेता, अशी स्तुती यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

पक्षातील सूत्रांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही अलीकडेच वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या प्रक्रियेमध्ये पडद्यामागे सक्रिय असून, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार व पक्ष यांच्यात समन्वय साधणारा नेता हवा, अशी त्यांची भूमिका आहे. निवडीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी योगींची मान्यता महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. योगी आगामी काळात मेरठमध्ये कावड यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. 

या नावांची चर्चा
एका माजी प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, या पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यात केशव मौर्य, रेखा वर्मा, बी.एल. वर्मा, श्रीकांत शर्मा आणि दिनेश शर्मा यांची नावे प्रमुख आहेत. समीकरणे संतुलित करण्यासाठी ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची निवड केली जाऊ शकते. विशेषतः योगी स्वतः उच्चवर्णीय ठाकूर गटाचे प्रतिनिधित्व करतात.

हिंदुत्ववादी प्रतिमा
योगी आदित्यनाथ हिंदुत्ववादी प्रतिमेला अधोरेखित करणारी पावले उचलत आहेत. पंतप्रधान मोदी यांची पुढील महिन्यात वाराणसीला भेट आणि स्थानिक निवडणुका लक्षात घेता भाजप नेतृत्व उत्तर प्रदेशातील रणनीतीत बदल करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. योगींची दिल्ली भेट ही त्याची सुरुवात ठरू शकते.

Web Title: Yogi's Delhi visit and discussion on state president election; OBC face or female leader may be selected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.