योगीराज : लखनौत ६० टक्के पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी ब्राह्मण किंवा ठाकूर; यादवांना डावलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 18:09 IST2019-06-28T18:06:06+5:302019-06-28T18:09:24+5:30
अखिलेश यादव सरकारमध्ये नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापासून पुरस्कार वितरणापर्यंत जातीवादाचा आरोप केला जात होता. परंतु, आता राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार देखील त्याच मार्गावर निघाले आहे.

योगीराज : लखनौत ६० टक्के पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी ब्राह्मण किंवा ठाकूर; यादवांना डावलले
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने याआधी समाजवादी पक्षाचा 'यादववाद' आणि मायावतींच्या 'जाटववाद'च्या विरोधात अनेकदा रस्त्यावरून उतरून विधानसभेपर्यंत विरोध केला आहे. अखिलेश यादव सरकारमध्ये नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापासून पुरस्कार वितरणापर्यंत जातीवादाचा आरोप केला जात होता. परंतु, आता राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार देखील त्याच मार्गावर निघाले आहे. लखनौमधील ६० टक्क्यांहून अधिक पोलिस ठाण्यांची जबाबदारी ब्राह्मण किंवा क्षत्रिय समाजातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
राज्यातील चर्चित आयजी अमिताभ ठाकूर यांची पत्नी डॉ. नुतन ठाकूर यांनी माहितीच्या आधिकाराखाली लखनौमधील पोलिस ठाणाप्रमुखांची यादी मागवली होती. त्यानुसार लखनौच्या एसएसपी कलानिधी नैथानी यांनी २५ जून रोजी ठाणेप्रमुखांची यादी दिली. यादीनुसार राजधानीतील सर्वाधिक ठाण्यात क्षत्रिय किंवा ब्राह्मण ठाणे प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत.
लखनौमध्ये ४३ पोलिस ठाणे आहेत. यापैकी १४ ठाण्यात क्षत्रिय, ११ मध्ये ब्राह्मण, ९ ठिकाणी मागास, ८ ठिकाणी अनुसूचित जाती आणि एका ठाण्यात मुस्लीम ठाणेप्रमुख नियुक्त करण्यात आले. अशा प्रकारे लखनौमधील एकूण ठाणाप्रमुखांमध्ये ६० टक्के ब्राह्मण किंवा ठाकूर नियुक्त आहेत. यात केवळ क्षत्रिय जातीचे एक तृतीयांश ठाणाप्रमुख आहेत. विशेष म्हणजे लखनौच्या एकाही ठाण्याच्या प्रमुखपदी यादव समूहातील कुणालाही नियुक्त करण्यात आलेले नाही. यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्या नुतन ठाकूर यांनी केला आहे.