यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:19 IST2025-09-06T12:16:52+5:302025-09-06T12:19:25+5:30

राजधानीच्या अनेक भागांत महापुराचे पाणी शिरले; पाणीपातळी २०७.३१ मीटरवर

Yamuna floods half of Delhi; Situation critical in Noida, Ghaziabad | यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट

यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट

नवी दिल्ली: यमुना नदीला महापूर आल्यामुळे राजधानी दिल्लीत अनेक भागांत पाणी शिरले असून नदीतील पाणीपातळी शुक्रवारी सकाळी धोक्याच्या पातळीच्या वर २ मीटर म्हणजे २०७.३१ मीटरवर पोहोचली. परिणामी महानगराच्या अनेक सखल भागांत पाणी शिरले असून निम्मे शहर जलमय झाले आहे. वासुदेव घाट ओलांडून पाणी वस्त्यांत व रिंगरोडवर शिरले असून हे पाणी उपसण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. यमुनेच्या पाण्यामुळे नोएडा व गाझियाबादमध्ये स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. या परिसरातील अनेक भागांत सध्या गुडघ्याच्या वर पाणी आहे. 

ताजमहालापर्यंत लाटा 
यमुनेच्या पाण्याच्या लाटा आता आग्रा येथील ताजमहालाच्या मागच्या बाजूस धडकू लागल्या आहेत. ताजच्या व्ह्यू पॉइंटपर्यंत पाणी पोहोचले असून बांधांच्या गेटमधून सतत पाणी सोडले जात आहे. पुरामुळे वृंदावनचा परिक्रमा मार्ग पाण्यात बुडाला असून यमुनेत विविध धरणे व प्रकल्पांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण देश आपदग्रस्तांच्या सोबत आहे : राष्ट्रपती
नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या जीवित व मालमत्तांच्या हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अशा संकटात संपूर्ण देश आपदग्रस्तांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, आसामसह इतर भागांत जीवितहानीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

पंजाबमध्येही लोक झाले हवालदिल
- लुधियाना जिल्ह्यात सतलज नदीच्या पुरामुळे अनेक गावांना फटका बसला असून आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता पाहता या भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- पंजाबमध्ये आतापर्यंत पूर व दुर्घटनांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४३ झाली असून सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे.

काश्मीरवर आभाळ कोपले, मदत मिळेना
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक सखल भाग पाण्यात आहेत. विशेषत: बडगाम, पुलवामा आणि श्रीनगर जिल्ह्यांतील बहुतांश गावांत स्थिती अत्यंत बिकट असून या भागात प्रशासकीय मदत अजूनही पोहोचलेली नाही.दरम्यान, उत्तर भारतात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह इतर राज्यांत पावसाचा जोर ओसरला असून मदतकार्याला वेग आला आहे. 

२०१४ च्या आठवणी ताज्या
झेलम नदीच्या पुरात यावर्षी काश्मीरमध्ये हाहाकार माजला होता. अनेक घरे, दुकाने आणि व्यवसाय यामुळे पाण्यात गेले होते. उपजीविकेची सर्व साधनेच नष्ट झाली. काश्मिरी लोकांच्या २०१४च्या आठवणी यावर्षी पुन्हा ताज्या झाल्या. 

Web Title: Yamuna floods half of Delhi; Situation critical in Noida, Ghaziabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.