धक्कादायक : महिलांनी थुंकीने भरलेल्या कॅरीबॅग घरात फेकल्या, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 13:13 IST2020-04-13T13:00:44+5:302020-04-13T13:13:21+5:30
यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने कोटामध्ये खळबळ उडवली आहे. यात काही महिला एका पॉलिथीन बॅगमध्ये थुंकल्यानंतर त्या घराच्या दरवाजातून आत फेकत असल्याचे दिसत आहे.

धक्कादायक : महिलांनी थुंकीने भरलेल्या कॅरीबॅग घरात फेकल्या, परिसरात खळबळ
कोटा : संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोजच्या रोज अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण समोर येत आहेत. असे असतानाच राजस्थानात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कोटा शहरात काही महिला पॉलिथीनमध्ये थुंकी भरून त्या घरात फेकत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने कोटामध्ये खळबळ उडवली आहे. यात काही महिला एका पॉलिथीन बॅगमध्ये थुंकल्यानंतर त्या घराच्या दरवाजातून आत फेकत असल्याचे दिसत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महापालिकेला सांगून संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वी राजस्थानच्या जोधपूरमध्ये काही घरांच्या लेटर बॉक्समध्ये दहा-दहा रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस तपासात या नोटा खोट्या असल्याचे आढळून आले.
राजस्थानातील कोरोना बाधितांची संख्या 815 -
राजस्थानात आतापर्यंत 815 कोरोनाबाधित सापडले आहेत. यापैकी 11 जण नवे रुग्ण आहेत. राजस्थानातील एकूण कोरोना संक्रमितांमध्ये दोन इटालीयन आणि 52 इराणमधून आणलेल्या लोकांचा समावेश आहे. या सर्वांना जोधपूर आणि जस्सलमेर येथील लष्कराच्या आरोग्य केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. जयपूरयेथे आतापर्यंत सर्वाधिक 341 कोरोना बाधित आहेत. राजस्थानात 22 मार्चपासूनच लॉकडाऊन असून जवळपास 40 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.