पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:48 IST2025-07-14T14:47:54+5:302025-07-14T14:48:19+5:30
Uttar Pradesh News: नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेली महिला सुमारे १० तास जीवन मरणाशी संघर्ष केल्यानंतर ६० किमी अंतरावर जिवंत सापडल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बलिया येथे घडली आहे.

पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेली महिला सुमारे १० तास जीवन मरणाशी संघर्ष केल्यानंतर ६० किमी अंतरावर जिवंत सापडल्याची घटना उत्तर प्रदेशमधील बलिया येथे घडली आहे. देवरिया जिल्ह्यातील शशी किरण देवी ही ५० वर्षीय महिला पाय घसरून शरयू नदीत वाहून गेली होती. नदीला पूर आलेला असल्याने ती पाण्याच्या प्रवाहासोबत दूर गेली. त्यानंतर सुमारे १० तास तिचा जीवन मरणाशी संघर्ष सुरू होता. अखेरीस ६० किमी अंतरावर मनियर दियारा येथे स्थानिक लोक आणि पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करत या महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार देवरिया येथील मइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलिया दक्षिण येथील घनश्याम पांडेय यांची पत्नी शशी किरण देवी ही पहाटे ४ वाजता फिरायला गेली होती. यादरम्यान, नदीत पाय धूत असताना तिचा पाय घसरला आणि ती पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत नदीत वाहून गेली. बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तिच्याबाबत काहीच माहिती मिळू शकल नाही.
दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मनियर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुयारा येथे म्हैश चरायला घेऊन गेलेल्या वीरेंद्र प्रतापची पत्नी निर्मला देवी हिने नदीमधून वाहत जात असलेल्या महिलेला मदतीसाठी हात हलवताना पाहिले. त्यानंतर निर्मला देवी हिने आरडा ओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर लोकांनी पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या महिलेला सुखरूपपणे वाचवले. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.
या भागामध्ये सरयू नदीला घाघरा या नावाने ओळखले जाते. नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आल्यानंतर पोलिसांनी शशी किरण देवी या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या महिलेच्या नातेवाईकांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. अखेरीस संध्याकाळी या महिलेचे नातेवाईक आल्यानंतर तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.