बेडरूममध्ये छुप्या कॅमेऱ्याने महिलेचे व्हिडिओ चित्रित केले, ५० लाखांची खंडणीची मागणी; बेळगावमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:03 IST2026-02-06T12:02:04+5:302026-02-06T12:03:03+5:30
खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

संग्रहित छाया
बेळगाव : बेळगावमधील माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचे खासगी व्हिडिओ चित्रित करून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तंत्रज्ञानाचा अत्यंत घातक वापर करून हा गुन्हेगारी प्रकार घडला असून, पोलिस आयुक्तांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
माळमारुती परिसरातील एका घरात लाईटच्या बल्ब होल्डरमध्ये आरोपींनी अतिशय शिताफीने हिडन कॅमेरा लपवला होता. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून महिलेचे चित्रीकरण करून आरोपींनी पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ५० लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत मार्केट पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या समीर शेख, अब्दुल रशीद मकानदार आणि मोहम्मद दिलावर या तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती भूषण बोरसे यांनी दिली.
या धक्कादायक घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण असून, पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये अनोळखी वस्तू किंवा संशयास्पद उपकरणे आढळल्यास त्याची खात्री करावी. तसेच कोणी अशा प्रकारे धमकावत असल्यास घाबरून न जाता थेट पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन भूषण बोरसे यांनी केले आहे.