Woman beaten to death by in-laws her family says she had refused to accept triple talaq | धक्कादायक! तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केल्याने महिलेला जिवंत जाळलं

धक्कादायक! तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केल्याने महिलेला जिवंत जाळलं

ठळक मुद्देतिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केली म्हणून एका महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील श्रावस्तीमध्ये ही घटना घडली.22 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार केली म्हणून तिला तिच्या मुलीसमोर जिवंत जाळण्यात आलं आहे. 

लखनऊ - तिहेरी तलाकविरोधी कायदा लागू झाला असला तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. तिहेरी तलाक देणाऱ्या पतीविरोधात तक्रार केली म्हणून एका महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील श्रावस्तीमध्ये ही घटना घडली आहे. 22 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार केली म्हणून तिला तिच्या मुलीसमोर जिवंत जाळण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील गद्रा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सईदा असं महिलेचं नाव असून तिचा पती नफीस याने तिला फोनवर तिहेरी तलाक दिला होता. सईदाने या विरोधात पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. यावरून नफीस आणि सईदामध्ये वाद झाला. रागाच्या भरात पतीने आपल्या कुटुंबियांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण केली आणि जिवंत जाळलं. सईदाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

सईदाचे वडील रमजान खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नफीस मुंबईत काम करतो. 6 ऑगस्टला त्याने फोनवरून सईदाला तिहेरी तलाक दिला होता. यामुळे सईदाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर 15 ऑगस्टला पुन्हा पोलिसांनी दोघांना बोलावून घेतले आणि एकमेकांसोबत राहण्याचा सल्ला दिला होता. सईदाची मुलगी फातिमाने पोलिसांना घरामध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आई-वडिलामध्ये वाद झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'माझे बाबा घरी आले आणि त्यांनी आईला घरी जाण्यास सांगितलं. त्यावरून त्या दोघांमध्ये खूप वाद झाला. त्यानंतर आजी, आजोबा आणि काकी आले. बाबांनी आईला खूप मारहाण केली आणि इतर लोकांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतलं. त्यानंतर आग लावून जाळलं' अशी माहिती सईदाची मुलगी फातिमाने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. श्रावस्तीचे पोलीस अधीक्षक आशिष श्रीवास्तव यांनी या प्रकरणी सईदाचा पती आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली. तिहेरी तलाकची तक्रार केली म्हणून मुलीला जिवंत जाळल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली आहे. याचा तपास करण्यात येत असल्याचं देखील श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. 

 

Web Title: Woman beaten to death by in-laws her family says she had refused to accept triple talaq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.