Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 20:43 IST2025-11-23T20:42:26+5:302025-11-23T20:43:06+5:30
२१ नोव्हेंबर रोजी दुबई एअर शोमध्ये झालेल्या अपघातात विंग कमांडर नमांश स्याल शहीद झाले.

Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी दुबई एअर शोमध्ये 'तेजस' या लढाऊ विमानच्या अपघातात शहीद झालेल्या नमांश यांना रविवारी त्यांच्या मूळ गावी पटियालकर, कांगडा राजकीय सन्मानाने अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांना शेवटचा निरोप देताना संपूर्ण देशाच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.
या अंतिम क्षणी, ज्या क्षणाने उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणले, तो म्हणजे नमांश यांच्या पत्नीने, विंग कमांडर अफशां यांनी आपल्या वीरपतीला दिलेला 'अंतिम सॅल्यूट'. स्वतः एअरफोर्सच्या वर्दीत उभ्या असलेल्या अफशां यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, पण चेहऱ्यावर अदम्य साहस दिसत होते. हे दृश्य पाहून उपस्थितांनाही वीरपत्नीचा अभिमान वाटला.
६ वर्षांची चिमुकली आणि वीरपत्नी!
२१ नोव्हेंबर रोजी दुबई एअर शोमध्ये झालेल्या अपघातात विंग कमांडर नमांश स्याल शहीद झाले. त्यांचे पार्थिव शरीर जेव्हा दुबईतून हिमाचलमधील कांगडा विमानतळावर आणले गेले, तेव्हा तिथे हजारो नागरिकांनी गजबजून गर्दी केली होती.
नमांश यांची पत्नी अफशां या स्वतः विंग कमांडर आहेत. जेव्हा त्या भारतीय वायुसेनेच्या वर्दीत पतीचे पार्थिव शरीर स्वीकारण्यासाठी पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची ६ वर्षांची निरागस कन्या देखील होती. आपल्या वडिलांचे पार्थिव शरीर पाहून या चिमुकलीला तिचे वडील आता या जगात नाहीत, याची कदाचित कल्पनाही आली नसेल!
#WATCH | Himachal Pradesh: Wing Commander Afshan salutes her husband, Wing Commander Namansh Syal, as she pays her last respects to him.
— ANI (@ANI) November 23, 2025
Wing Commander Namansh Syal lost his life in the LCA Tejas crash in Dubai on 21st November. pic.twitter.com/DPKwARut4r
'भारत माता की जय'चा जयघोष
शहीद पतीला वर्दीमध्ये अखेरची मानवंदना देताना अफशां यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण त्या पूर्ण धैर्याने उभ्या होत्या. नमांश आणि अफशां यांचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. नमांश यांचे इतक्या लवकर जगातून निघून जाणे कोणालाही अपेक्षित नव्हते.
नमांश यांच्या अंत्ययात्रेत 'भारत माता की जय' आणि 'वीर जवान अमर रहे' अशा घोषणा संपूर्ण परिसरातून ऐकू येत होत्या. नमांश यांचा असा मृत्यू संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे आणि पत्नी अफशां यांनी दिलेली ही अखेरची सलामी प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्शून गेली आहे.