बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 05:32 IST2025-10-08T05:32:34+5:302025-10-08T05:32:53+5:30
महिला, युवक अन् इतर गटांना ४० हजार कोटी रुपयांचे राज्य सरकारकडून ‘पॅकेज’; होणार अटीतटीची लढत; सर्वांच्या नजरा चिराग पासवान यांच्या भूमिकेकडे; २०२०च्या निवडणुकीत एनडीए व महागठबंधनमध्ये मतांचा फरक फक्त ११,१५०; प्रशांत किशोर-पासवान एकत्र आल्यास नवे समीकरण

बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहारमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीची लढत चुरशीची ठरणार आहे. २०२०च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी १२५ जागा जिंकून सत्ता मिळवली होती, तर महागठबंधनला ११० जागा मिळाल्या होत्या. मात्र दोन्ही आघाड्यांच्या मतांमध्ये केवळ ११,१५० मतांचा फरक होता. एनडीएला १ कोटी ५७ लाख २ हजार ६५० मते (३७.२६ टक्के) मिळाली होती, तर महागठबंधनला १ कोटी ५६ लाख ९१ हजार ५०० मते (३७.२३ टक्के) मिळाली होती.
२०२५ मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे मानले जात असले तरी त्यांनी निवडणुकीआधी मोठे आर्थिक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने तब्बल ४० हजार कोटी रुपये विविध योजना आणि अनुदानाच्या स्वरूपात महिला, युवक आणि इतर गटांना दिले आहेत. हे प्रमाण राज्याच्या उपलब्ध निधीपैकी सुमारे ६६ टक्के इतके प्रचंड आहे.
चिराग ‘किंगमेकर’ की?
२०२० मध्ये चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी (लोजपा) एनडीएपासून वेगळी लढली होती; तिला २५ लाख मते (५.६६ टक्के) मिळाली होती. यावेळी पासवान ३५ जागांवर उमेदवार देण्याचा आग्रह धरत आहेत. भाजपकडून लोजपाला २५ पेक्षा जास्त जागा देण्याची तयारी आहे.
मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न
‘मी भाजीवरच्या मिठासारखा आहे, प्रत्येक मतदारसंघात मी २० ते २५ हजार मते फिरवू शकतो’, असे पासवान यांनी यापूर्वी म्हटले होते. यावेळी चिराग मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेसह मैदानात उतरले आहेत. प्रशांत किशोर आणि त्यांची नवी आघाडी निर्माण झाली तर संपूर्ण समीकरण बदलले जाईल.
या आहेत हॉटसीट
१. वाल्मीकीनगर धीरेंद्र प्रताप सिंह (जदयू)
२. करगहर संतोष कुमार मिश्रा (काँग्रेस)
३. करकट अरुण सिंह (भाकपा)
४. बेतिया रेनू देवी (भाजप)
५. मोतिहारी प्रमोद कुमार (भाजप)
६. इमामगंज दीपा कुमारी (हिंदुस्थानी आवाम मोर्चा (सेक्युलर)
७. सीतामढी मिथिलेश कुमार (भाजप)
८. मधुबनी समीर कुमार महासेठ (राजद)
९. झंझारपूर नितीश मिश्रा (भाजप)
१०. अररिया आबिदुर रहमान (काँग्रेस)
११. किशनगंज इजहारुल हुसैन (काँग्रेस)
१२. पूर्णिया विजय कुमार खेमका (भाजप)
उमेदवारांच्या निवडीसाठी काँग्रेसची आज बैठक
पुढील महिन्यात बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बुधवारी बैठक होत आहे.
महाआघाडी म्हणून काँग्रेस, राजद व डावे पक्ष एकत्र निवडणूक लढत आहेत. महाआघाडीने १९ जागा लढवण्याचा प्रस्ताव ‘भारतीय कमुनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन’ समोर ठेवला मात्र, हा प्रस्ताव सन्मानजनक नसल्याचे त्यांनी
म्हटले आहे.
एनडीएला गळती
एनडीएला मुखेश साहनींच्या व्हीआयपी पक्षाने धक्का दिला आहे. या पक्षाला २०२० मध्ये ६.५ लाख मते (१.५२ टक्के) मिळाली होती. आता हा पक्ष इंडिया आघाडीत सामील झाला आहे. त्यामुळे बिहारमध्ये यावेळी निवडणूक अत्यंत रोमांचक आणि काट्याची ठरणार आहे.