आता महागाईचा भडका उडणार? व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर मोठा परिणाम होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:08 IST2026-01-04T13:06:27+5:302026-01-04T13:08:20+5:30
कच्च्या तेलाचे भांडार असलेल्या या देशातील अनिश्चित राजकीय परिस्थितीमुळे भारतासह जगाचे टेन्शन वाढले आहे.

आता महागाईचा भडका उडणार? व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर मोठा परिणाम होणार!
अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने जागतिक भू-राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे, जागतिक खनिज तेल बाजारावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे भांडार असलेल्या या देशातील अनिश्चित राजकीय परिस्थितीमुळे भारतासह जगाचे टेन्शन वाढले आहे.
महागाईचा धोका
व्हेनेझुएलाने २०२५ मध्ये रोज ९ लाख बॅरल एवढ्या तेलाचे उत्पादन कले. या पुरवठ्यात व्यत्यय आल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत जागतिक स्तरावर वाढ होणे अटळ आहे. यामुळे जे देश आपली बहुतांश गरज तेलाच्या आयातीद्वारे पूर्ण करत, अशा देशांना महागडे तेल खरेदी करावे लागल्यास देशातील महागाई वाढू शकते. यात भारताचाही समावेश आहे.
भारताचा १० व्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला -
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर दाललेले टॅरीफनंतर, आता व्हेनेझुएला संकट भारतासाठी नवी डोकेदुखी ठरू शकते. २०१३ मध्ये भारताच्या एकूण तेल आयातीत व्हेनेझुएलाचा वाटा १०% होता. २०२० मध्ये हा वाटा ३.६% पर्यंत घसरला. मात्र, नंतर, २०२५ मध्ये व्हेनेझुएला भारताचा १० व्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला. गेल्या वर्षात भारताने तब्बल २२ दशलक्ष बॅरल एवढे तेल तेथून खरेदी केले होते. मात्र, आता अमेरिकेच्या या कारवाईमुळे ही पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते.
भारत आणि व्हेनेझुएलामध्ये तेल व्यापाराव्यतिरिक्त औषधनिर्माण, यंत्रसामग्री आणि कापड उद्योगात मोठे संबंध आहेत. भारताने नुकत्याच तेथे जीवनरक्षक लसी पाठवल्या असून डिजिटल सहकार्यावरही करार केले आहेत. जर या देशावर अमेरिकेचा प्रभाव वाढला, तर भारतासोबतच्या भविष्यातील व्यापारावर आणि धोरणांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.