नवी दिल्ली : यापुढे तुम्ही मतदान कराल तेव्हा बोटावरील शाईचे निशाण आणखी गडद झालेले आणि आकारही वाढलेला दिसेल. निवडणूक अधिकारी शाईचा वापर योग्यरीत्या करीत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे. बोटावर शाई लावण्यासाठी खास ब्रश तयार केले जाणार असून निवडणूक अधिकाऱ्यांना अशा ब्रशचा वापर करणे बंधनकारक केले जाईल.डाव्या बोटाच्या तर्जनीवरील (पहिले बोट) नखापासून पहिल्या सांध्यापर्यंत शाई लावली जाणार असून ब्रशने लावल्या जाणाऱ्या शाईचा आकारही मोठा करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर बटण दाबण्यापूूर्वी मतदारांच्या बोटावर शाईचे निशाण लावणे अनिवार्य असेल. आयोगाच्या नियंत्रण शाखेकडे निगराणी ठेवण्याची जबाबदारी राहील. अलीकडेच निवडणुकीत बोटावर लावलेली शाई सहज मिटणारी होती व ती योग्यरीत्या लावण्यात आली नसल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)