१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:14 IST2025-06-19T16:14:15+5:302025-06-19T16:14:53+5:30

सोनम रघुवंशीचा प्रियकर राज कुशवाहा याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना फाटलेल्या जुन्या १० रुपयांच्या नोटांचे फोटो सापडले आहेत.

Will 10 rupee note change entire story of Raja Raghuvanshi case The story of the Raja Raghuvanshi case? 'This' person is caught in the circle of suspicion! | १० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!

१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!

आतापर्यंत प्रेमत्रिकोण मानल्या जाणाऱ्या इंदूरमधील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येमागे धक्कादायक सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने आता एक नवीन वळण घेतले आहे, ज्यात सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंदूर गुन्हे शाखेने गोविंदला चौकशीसाठी बोलावले असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचे मूळ हवाला व्यवसायात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहे. यामुळे राजा रघुवंशी यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद झाले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, सोनम रघुवंशीचा प्रियकर राज कुशवाहा याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना फाटलेल्या जुन्या १० रुपयांच्या नोटांचे फोटो सापडले होते. हे फोटो हवाला व्यवहारात पुरावा म्हणून वापरले जात असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनुसार, हे फोटो हवाला नेटवर्कमधील 'कोडवर्ड' होते, ज्यांच्या मदतीने लाखो रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार केले जात होते.

चौकशीदरम्यान, राज कुशवाहाने सोनम आणि गोविंद रघुवंशी यांच्यासोबत हवाला व्यवसायात सामील असल्याची कबुली दिली आहे. या नोटांच्या छायाचित्रांमुळे केवळ हवाला कनेक्शनची पुष्टी झाली नाही, तर आर्थिक गुन्हेगारीच्या या खोलवरच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. तपासात असेही समोर आले आहे की, सोनम आणि गोविंद यांनी त्यांचे नातेवाईक जितेंद्र रघुवंशी यांच्या बँक खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार केले आहेत. काही खात्यांमध्ये तब्बल १४ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी आणि पैसे काढल्याचे पुरावे सापडले आहेत.

मनी लाँड्रिंगच्या दिशेने ईडीचा तपास
इंदूर गुन्हे शाखेने हवालाशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि रोख व्यवहारांची माहिती अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सोपवली आहे. ईडी आता या प्रकरणाची मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून सखोल चौकशी करणार आहे. गोविंद रघुवंशी यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून, त्यांचा प्लायवूड आणि लॅमिनेशन व्यवसाय, श्री बालाजी अॅक्टोरियो, हा हवाला रॅकेटचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.

पोलिसांनी गोविंदच्या ऑफिस आणि गोदामाची झडती घेतली असून, तिथून काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, गोविंदच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे, जेणेकरून हवाला नेटवर्कमधील त्यांची भूमिका निश्चित करता येईल. गोविंदने सोनमशी संबंध तोडल्याची घोषणा केली असली तरी, पोलीस त्याच्या व्यावसायिक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. राजा रघुवंशी यांच्या हत्येचे रहस्य आता हवाला व्यवसायाच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकले आहे.

Web Title: Will 10 rupee note change entire story of Raja Raghuvanshi case The story of the Raja Raghuvanshi case? 'This' person is caught in the circle of suspicion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.