अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:38 IST2025-10-12T10:35:56+5:302025-10-12T10:38:17+5:30
मध्य प्रदेशातील एका महिलेने करवा चौथच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी फक्त प्रार्थना केली नाही तर त्याला जीवदान दिलं आहे.

अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
मध्य प्रदेशातील एका महिलेने करवा चौथच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी फक्त प्रार्थना केली नाही तर त्याला जीवदान दिलं आहे. राजगड येथील प्रिया हिने तिचा पती पुरुषोत्तमचा जीव वाचवण्यासाठी आपली एक किडनी दिली. काही महिन्यांपूर्वी पुरुषोत्तमला कोरोनाची लागण झाली. बरं झाल्यानंतर, त्याला सतत डोकेदुखी आणि थकवा जाणवू लागला. जेव्हा त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत.
डॉक्टरांनी इशारा दिला होता की जर किडनी ट्रान्सप्लान्ट केलं नाही तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. कुटुंबीय घाबरले होते. याच दरम्यान प्रियाने मोठा निर्णय घेतला. "जर माझी किडनी देऊन माझ्या पतीचा जीव वाचू शकतो, तर तीच माझी खरी करवा चौथ असेल" असं म्हणाली. हे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आणि अहवालात स्पष्टपणे म्हटलं गेलं की प्रियाची किडनी पुरुषोत्तमच्या किडनीशी मॅच होते.
ऑपरेशनची तयारी सुरू झाली. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि काही दिवसांतच पुरुषोत्तमची प्रकृती सुधारू लागली. आता, दोघेही पूर्णपणे ठीक आहेत आणि एकत्र त्यांचं नवीन जीवन सुरू करत आहेत. पुरुषोत्तम एका मुलाखतीत म्हणाला की, "मी माझ्या पत्नीला सांगतो की, मी आता तिचा चंद्र आहे. कारण माझं आयुष्य आता तिच्यामुळे चमकत आहे."
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच, लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. लोक या जोडप्याचं कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने "म्हणूनच पत्नीला तिच्या पतीची अर्धांगिनी म्हटलं जातं" अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या युजरने "खरं प्रेम हेच असत, ते फक्त बोलून सिद्ध होत नाही. प्रियाने केवळ प्रेम व्यक्त केलं नाही तर तिचं प्रेम खरे आहे हे सिद्धही केलं" असं म्हटलं आहे.