पत्नीला लागली हॉटेलमधील जेवणाची चटक, दररोज करून लागली ऑर्डर, पतीने विरोध केल्यावर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:51 IST2025-02-05T13:51:01+5:302025-02-05T13:51:56+5:30
Relationship News: ऑनलाईन जेवण मागवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीला हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय लागली होती. तर दररोज बाहेरून जेवण मागवण्यास पती विरोध करत होता. पतीने ऑनलाईन जेवण मागवण्यास दिलेल्या नकारामुळे या दोघांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.

पत्नीला लागली हॉटेलमधील जेवणाची चटक, दररोज करून लागली ऑर्डर, पतीने विरोध केल्यावर...
बदलत्या काळासोबत पती-पत्नीमधील संबंधांमध्येही खूप बदल झाले आहेत. तसेच बऱ्याच पती-पत्नीमध्ये अगदी किरकोळ कारणांवरून तणाव निर्माण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील आग्रा येथून असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे ऑनलाईन जेवण मागवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीला हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय लागली होती. तर दररोज बाहेरून जेवण मागवण्यास पती विरोध करत होता. पतीने ऑनलाईन जेवण मागवण्यास दिलेल्या नकारामुळे या दोघांमधील वाद एवढा वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले.
ऑनलाईन जेवण मागवण्यावरून झालेल्या वादातून पती-पत्नीमध्ये मारहाणीचा प्रकार घडला. त्यामुळे नाराज झालेली पत्नी माहेरी निघून गेली. एवढंच नाही तर तिने पतीविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दिली. त्यानंतर पोलिसांनी ही तक्रार कुटुंब समुपदेशन केंद्राकडे हस्तांतरि केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आग्रा येथे रहणाऱ्या या पती-पत्नीचा विवाह गतवर्षी म्हणजेच २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही काळ दोघांमधील नातं सुरळीत सुरू होतं. त्यादरम्यान, एकेदिवशी पतीने हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर दिली. एकदा बाहेरील खाल्ल्यानंतर पत्नीला या जेवणाची चटक लागली. ती दररोज बाहेरून जेवण मागवण्याचा हट्ट पतीकडे करू लागली.
सुरुवातीला दररोज बाहेरून मागवलेलं जेवण खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, त्यामुळे घरात जेवण बनवत जा असं पतीने पत्नीला समजावून सांगितलं. मात्र पतीच्या या सल्ल्यामुळे ही पपत्नी नाराज झाली. त्यानंतर हॉटेलमधून जेवण मागवण्यावरू पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होऊ लागलं. एकेदिवशी हा वाद एवढा वाढला की, दोघांमध्ये मारहाणही झाली. त्यानंतर पत्नी रागाने माहेरी निघून गेली. तेव्हापासून मागचे दोन महिने ती माहेरीच आहे. तसेच तिने पतीविरोधात पोलिसांकडे तक्रारही दिली.
दरम्यान, या प्रकरणाचा अंदाज घेतल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग केली. तिथे पती आणि पत्नीचं समुपदेशन करण्यात आलं. पती-पत्नीची समजूत घालण्यात आल्याचं समुपदेशकांनी सांगितलं आहे. रोज बाहेरून जेवण न मागवता घरात जेवण बनवत जा असा सल्ला पत्नीला देण्यात आला. तर कधी कधी हॉटेलमधून जेवण मागवत जा, असा सल्ला पतीला देण्यात आला आहे. त्यानंतर या सल्ल्यावर दोघांनाही राजी करून त्यांच्यात समुपदेशकांनी सध्यातरी समेट घडवून आणला आहे.