कोरोना पॉझिटिव्ह पत्नी, मुलीच्या देखभालीसाठी मिळाली नाही सुट्टी; उत्तर प्रदेशमधील पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:24 PM2021-05-04T14:24:39+5:302021-05-04T14:28:39+5:30

Manish Chandra Sonkar : मुलीची देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याने उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याने राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे. 

wife gets corona co sadar manish chandra sonkar resigns after not getting leave in jhansi | कोरोना पॉझिटिव्ह पत्नी, मुलीच्या देखभालीसाठी मिळाली नाही सुट्टी; उत्तर प्रदेशमधील पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

कोरोना पॉझिटिव्ह पत्नी, मुलीच्या देखभालीसाठी मिळाली नाही सुट्टी; उत्तर प्रदेशमधील पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,02,82,833 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,57,229 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,449 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,22,408 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करत आहेत. याच दरम्यान एक घटना समोर आली आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. मुलीची देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याने उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याने राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीला कोरोनाची लागण झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या झाशीमधील सर्कल ऑफिसर (सीओ) मनीष चंद्र सोनकर यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना सोनकर यांनी आपली कोरोनाबाधित पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याचं कारण दिलं आहे. सोनकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यपालांकडेही राजीनाम्याची एक प्रत पाठवली आहे. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी राजीनाम्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

मनीष सोनकर हे 2005 च्या तुकडीतील पीपीएस अधिकारी आहेत. सध्या ते झाशीचे सर्कल ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. सोनकर हे पत्नी आणि चार वर्षीय मुलीसोबत राहतात. काही दिवसांपूर्वी सोनकर यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. 30 एप्रिल रोजी सोनकर यांच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आयसोलेशनमध्ये राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोनकर यांची चार वर्षांची मुलगी त्याच्यासोबत राहू लागली. मुलीची सर्व जबाबदारी सोनकरांवर आली. त्याच दरम्यान पंचायत निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सोनकर यांची नियुक्ती करण्यात आली.

सोनकर यांनी फोन करुन तसेच एसएसपींशी चर्चा करुन आपल्या परिस्थितीसंदर्भात सांगत एक मे ते सहा मेदरम्यान सुट्टी मागितली. मात्र त्यांची नियुक्ती बडागाव ब्लॉकमधील पंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर करण्यात आली. यानंतर सोनकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय़ घेतला आणि त्यानुसार राजीनामा पाठवला. मनीष सोनकर यांनी थेट राजीनामा दिल्याने त्यांना आता सुट्टी देण्यात आली आहे. त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: wife gets corona co sadar manish chandra sonkar resigns after not getting leave in jhansi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.