आज देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वांच्या नजरा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे लागल्या होत्या, पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. यावरुन राजकीय चर्चा सुरू आहेत.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते स्वातंत्र्यदिनी आयोजित मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. 'आज तक'वरील एका कार्यक्रमात या संदर्भात विचारले असता, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. अजय उपाध्याय यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित न राहण्याचे स्पष्टीकरण दिले.
विरोधी पक्षनेत्याची जागा कुठे आहे?
अजय उपाध्याय म्हणाले की, राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद पंतप्रधानांनंतर कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जासह पहिल्या रांगेत असते. ते म्हणाले की, जवाहरलाल नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत ही परंपरा चालत आली आहे, मग ते कोणाचेही सरकार सत्तेत असो.
काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितले की, कोणताही पक्ष विरोधी पक्षनेता असला तरी, त्यांना पहिल्या रांगेत बसवण्यात आले आहे. पण, जेव्हा राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले तेव्हा गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आले.
'प्रतिष्ठेचे उल्लंघन होऊ नये'
अजय उपाध्याय म्हणाले की, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे दोघेही संवैधानिक पदांवर आहेत. हा संवैधानिक पदाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. हा कोणत्याही व्यक्तीचा प्रश्न नाही, असंही ते म्हणाले.
अजय उपाध्याय म्हणाले की, हा राहुल गांधींचा किंवा मल्लिकार्जुन खरगेंचा प्रश्न नाही. जर संवैधानिक पदावरील कोणत्याही व्यक्तीसोबत असे केले गेले तर ते संविधानाच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे.
अजय उपाध्याय म्हणाले, प्रतिष्ठेचे उल्लंघन होऊ नये म्हणून या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय उत्सव साजरा केला, राष्ट्रध्वज फडकावला आणि जर पंतप्रधानांना या मुद्द्याचे राजकारण करायचे असेल तर त्याचे राजकारण करू नये, असंही अजय उपाध्याय म्हणाले.
भाजपचे प्रत्युत्तर
काँग्रेसच्या उत्तरावर भाजपाने प्रत्युत्तर दिले. भाजप प्रवक्ते आरपी सिंह म्हणाले, "आज जागा कुठे ठेवल्या होत्या ते तुम्ही पाहिले का?" तत्पूर्वी, लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात विरोधी पक्षनेत्याच्या अनुपस्थितीवर भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपद हे एक संवैधानिक पद आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे त्यांचे संवैधानिक कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले.