मोदी सभागृहात का आले नाहीत? ओम बिर्ला यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, "काहीही घडले असते!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 07:45 IST2026-02-06T07:44:20+5:302026-02-06T07:45:20+5:30
Om Birla On Narendra Modi: काँग्रेसचे अनेक खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत ज्याठिकाणी बसतात तिथे पोहोचून एखादे अनपेक्षित कृत्य करू शकतात, अशी ठोस माहिती आपल्याकडे होती. त्यामुळे पंतप्रधानांनी आपले भाषण देण्यासाठी सभागृहात येऊ नये, अशी मी त्यांना बुधवारी विनंती केली, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सांगितले.

मोदी सभागृहात का आले नाहीत? ओम बिर्ला यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, "काहीही घडले असते!"
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: काँग्रेसचे अनेक खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत ज्याठिकाणी बसतात तिथे पोहोचून एखादे अनपेक्षित कृत्य करू शकतात, अशी ठोस माहिती आपल्याकडे होती. त्यामुळे पंतप्रधानांनी आपले भाषण देण्यासाठी सभागृहात येऊ नये, अशी मी त्यांना बुधवारी विनंती केली, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी सांगितले, तसेच लोकसभेने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविनाच मंजूर केल्याची आगळी घटनाही गुरुवारी घडली. विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला.
ओम बिर्ला म्हणाले की, पंतप्रधानांबाबत काही विपरीत प्रकार घडला असता, तर देशाच्या लोकशाही परंपरेला मोठा धक्का बसला असता. लोकसभेत विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी हातात फलक धरून पंतप्रधानांच्या आसनाच्या दिशेने बुधवारी धाव घेतली होती. मात्र, त्या वेळेस पंतप्रधान मोदी लोकसभेत उपस्थित नव्हते. विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या धक्कादायक प्रकारानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात बुधवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेले वर्तन हा देखील एक प्रकारचा कलंक आहे. सभागृहातही विरोधकांनी अतिशय अयोग्य वर्तन केले. असा प्रकार लोकसभेच्या इतिहासात आतापर्यंत घडला नव्हता.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यायच्या प्रसंगी विरोधकांनी काही अनपेक्षित कृती होऊ शकते, याची माहिती असल्यामुळे ते टाळण्यासाठी, मी पंतप्रधानांना त्या वेळेस लोकसभेत येऊ नका, अशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.
ओम बिर्ला, लोकसभा अध्यक्ष
मोदींविरोधात डाव रचल्याचा आरोप खोटा
काँग्रेसच्या सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसच्या खासदारांनी काहीतरी अनपेक्षित कृती करण्याचा डाव रचल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. पंतप्रधानांविरोधात काही कृती करण्याचा कोणताही डाव रचलेला नव्हता.
मनमोहन सिंग यांचेही भाषण झाले नव्हते
माजी लोकसभा महासचिव असलेले घटनातज्ज्ञ पी.डी.टी. आचारी यांनी सांगितले की, २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे भाषण झाले नव्हते. ते सभागृहात उपस्थित होते. मात्र, तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी उत्तरादाखल भाषण केले नव्हते. तसे निवेदन मनमोहन सिंग यांनी १० जून २००४ रोजी लोकसभेत केले होते.
आभार प्रदर्शन प्रस्ताव गदारोळात मंजूर
लोकसभेने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाविनाच मंजूर केल्याची घटना गुरुवारी घडली. विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, तसेच अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण न होताच तो प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यासह विविध मुद्यांवर विरोधक खासदारांनी निषेध व्यक्त करीत गदारोळ माजविल्यामुळे लोकसभेची कार्यवाही तहकूब करण्यात आली होती. दुपारी ०२:०० वाजता सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर अनेक विरोधी पक्षांचे खासदार सभागृहाच्या मध्यभागी हौद्यामध्ये धावले. सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्षपदावर असलेल्या संध्या राय यांनी सदस्यांना आपापल्या जागेवर बसण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचा गदारोळ कायम राहिल्याने त्यांनी सभागृह दुपारी ०३:०० वाजेपर्यंत तहकूब केले. यापूर्वी दुपारी १२:०० वाजता सभागृह सुरू झाले असता विरोधकांनी पुन्हा गदारोळ माजविला. त्यावेळी मोदी यांचे भाषण न होता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला.