'स्वतःची मुले इंग्रजी शाळेत आणि दुसऱ्यांच्या मुलांना मौलवी बनवायचं का?', योगी आदित्यनाथ भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:10 IST2025-02-18T16:09:54+5:302025-02-18T16:10:24+5:30
उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य केले. हे लोक दुहेरी चारित्र्याचे असल्याचे ते म्हणाले.

'स्वतःची मुले इंग्रजी शाळेत आणि दुसऱ्यांच्या मुलांना मौलवी बनवायचं का?', योगी आदित्यनाथ भडकले
Yogi Adityanath News: 'जे हिंदीमध्ये बोलू शकत नाहीत, त्यांना त्यांची भूमिका भोजपुरी, अवधी, ब्रज किंवा बुंदेलखंडी भाषेत मांडण्याचा अधिकार मिळायला पाहिजे', असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना लक्ष्य केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
समाजवादी पक्षाचे नेते माता प्रसाद पांडे यांनी उर्दू भाषेबद्दल एक मागणी केली होती. त्याला उत्तर देताना योगी आदित्यनाथ बोलत होते. त्यावेळी विरोधी बाकांवरील एका आमदाराने मध्येच विधान केल्यानंतर आदित्यनाथ यांचा पारा चढला.
स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवता -योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "ही काय भूमिका आहे की, भोजपुरीमध्ये बोलू नये आणि उर्दूमध्ये बोलावं. तुम्ही उर्दू भाषेची वकिली करत आहात. हा खूप विरोधाभास आहे. तुम्हा समाजवाद्यांचे चारित्र्य इतके दुटप्पी झाले आहे की, स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवता आणि दुसऱ्यांच्या मुलांना सांगतात की, त्यांनी गावातील अशा शाळांमध्ये जावं, जिथे शिकण्यासाठी सोयी-सुविधा नाहीत."
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, "मुलांना उर्दू शिकवून मौलवी बनवायचे आहे का? समाजवादी पक्षाच्या नेत्यांना देशाला कट्टरपंथाकडे न्यायचं आहे, पण हे चालणार नाही. समाजवाद्याचं दुहेरी चारित्र्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही काल भोजपुरी आणि अवधी भाषेचा विरोध केला. या भाषांना सन्मान मिळायला हवा की नाही? त्यामुळेच आमचे सरकार भोजपुरी अकादमी स्थापन करत आहे", असे उत्तर योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत दिले.
समाजवादियों का चरित्र दोहरा हो चुका है,
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 18, 2025
ये अपने बच्चों को पढ़ाएंगे इंग्लिश स्कूल में और दूसरों के बच्चों के लिए कहेंगे उर्दू पढ़ाओ...
उसको मौलवी बनाना चाहते हैं, ‘कठमुल्लापन’ की ओर देश को ले जाना चाहते हैं,
ये नहीं चल सकता है… pic.twitter.com/8RGaWJdY1h
भाषेवरून काय झाला वाद?
उत्तर प्रदेश विधानसभेत आमदारांच्या आसनावर भाषा प्रणाली लावण्यात आलेली आहे. त्यातील बदलावरून हा मुद्दा चर्चेत आला. विधानसभा अध्यक्षांनी सांगितले की, सर्व भाषांमध्ये ऐकण्याचा पर्याय असेल. फ्लोर लॅग्वेजचा (सभागृहात ज्या भाषेत भाषण केले जाईल ती) अर्थ असा आहे की, ज्या भाषेत आमदार बोलतील, ती तशीच ऐकता येईल. हा पर्याय शून्य चॅनेलवर असेल. भोजपुरीमध्ये कोणी बोलत असेल, तर ते शून्य चॅनेलवर येईल. हिंदी दोन नंबर चॅनेलवर येईल. त्यावरून हा मुद्दा उपस्थित झाला. याला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य केले.