Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 06:30 IST2025-11-16T06:28:31+5:302025-11-16T06:30:01+5:30
Bihar Next CM: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही मुख्यमंत्रिपदाबाबतचा संभ्रम कायम असून जदयूने नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा केली.

Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही मुख्यमंत्रिपदाबाबतचा संभ्रम कायम असून जदयूने नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपने अद्याप यावर स्पष्ट भाष्य केलेले नाही. एनडीएचे आमदार मुख्यमंत्री कोण हे ठरवतील, असे भाजपने म्हटले आहे.
भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत अत्यंत सावध भूमिका घेत भाष्य टाळले आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी थेट नितीश कुमार यांचे नाव अजून तरी घेतलेले नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी एक-दोन दिवसांत जनतेचे आभार मानण्यासाठी कार्यक्रम घेतला जाईल, असे सांगून त्यानंतर एनडीएचे आमदार नेता निवडतील, असे म्हटले आहे. शनिवारी दिवसभर नितीश कुमार यांच्या निवासस्थानी नेत्यांची ये-जा सुरू होती.
नितीश कुमार यांनी आमदारांना पाटण्यात बोलावले
बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या जदयूच्या आमदारांना रविवारी (दि. १६) पाटण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्रिपद व मंत्रिमंडळाच्या रचनेविषयी नितीश कुमार आमदारांशी चर्चा करण्याची शक्यता असून, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. एनडीए घटक पक्षांना द्यावयाच्या मंत्रिपदांसह नवीन सरकारच्या धोरणाविषयी देखील नितीश कुमार आमदारांशी चर्चा करतील.