मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 07:03 IST2025-07-25T07:03:01+5:302025-07-25T07:03:23+5:30
आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचासुद्धा सन्मान करायला पाहिजे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली : भाषा संवादाचे प्रभावी माध्यम असून भाषेपासून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. भाषा वादाचे कारण होऊ शकत नाही. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचासुद्धा सन्मान करायला पाहिजे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ तसेच ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्र'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित, तंजावर घराण्याचे छत्रपती बाबाजीराजे भोसले आणि कुलसचिव प्रा. रविकेश व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक दूरदृष्टी आणि युद्धनीतीचा अभ्यास जेएनयूसारख्या संस्थेत सुरू होणे ही अभिमानाची बाब आहे. शिवरायांच्या युद्धनीतीचे जगभरात कौतुक होते आहे.
महाराजांची प्रत्येक लढाई हे सामरिक शक्तीचे उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी जेएनयूमधील मराठी अध्यासन केंद्राची स्थापना हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे नमूद केले. जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतीश्री पंडित यांनी मराठी साहित्य, नाटक आणि कवितेचे महत्त्व विशद केले. प्रा. पंडित यांनी ‘सिंधुदुर्ग संवाद’ या राष्ट्रीय संवाद कार्यक्रमाची घोषणा केली. खा. डॉ. अजित गोपछडे, स्मिता वाघ, धनंजय महाडिक, मेधा कुलकर्णी, हेमंत सावरा, अनिल बोंडे आणि माजी खासदार विनय सहस्रबुद्धे कार्यक्रमात उपस्थित होते.
जेएनयूत महाराजांचा अश्वारूढ पुतळा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जेएनयूप्रमाणे सर्व विद्यापीठांत मराठी भाषेवर संशोधन झाले पाहिजे. जेएनयूत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा देशासाठी बलिदान आणि समाजसेवेची प्रेरणा देईल, असा विश्वासही फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.