दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:28 IST2025-11-14T06:27:30+5:302025-11-14T06:28:51+5:30
Delhi Blast Update: देशातील गुप्तचर संस्थांनी लाल किल्ल्याजवळील आत्मघाती बॉम्बहल्ल्याची इत्थंभूत कुंडली तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. यात हल्ल्याची योजना आखण्यापासून ते ट्रेनिंग, फंडिंग आणि स्फोटकांचा पुरवठा, आदी गोष्टींची संपूर्ण माहिती विविध संस्थांच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे.

दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - देशातील गुप्तचर संस्थांनी लाल किल्ल्याजवळील आत्मघाती बॉम्बहल्ल्याची इत्थंभूत कुंडली तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. यात हल्ल्याची योजना आखण्यापासून ते ट्रेनिंग, फंडिंग आणि स्फोटकांचा पुरवठा, आदी गोष्टींची संपूर्ण माहिती विविध संस्थांच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. यासाठी एनआयएला सर्वतोपरी सहकार्य करण्यास सांगण्यात आले आहे.
गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकांची अखंडित मालिका सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी पुन्हा एकदा सर्व तपास संस्थांच्या प्रमुखांबरोबर चर्चा करून हल्ल्याचे मूळ शोधून काढण्यास सांगितले आहे. या बैठकीला गृह सचिव, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते, विशेष सचिव (देशांतर्गत सुरक्षा), आयबी चीफ आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलछा यांच्यासह अनेक बडे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. यास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेसुद्धा उपस्थित होते. देशभरातील संस्था अलर्ट मोडवर असून, दिवसेंदिवस या हल्ल्याशी संबंधित नवीन माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी हरयाणाच्या फरिदाबाद आणि पश्चिम बंगालमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. ही स्फोटके कुणी दिली आणि भारतात कुठे-कुठे पोहोचविण्यात आली, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या डॉक्टरांना हल्ल्याचे ट्रेनिंग कुणी दिले, आणखी कुणाकुणाला ट्रेनिंग देण्यात आले आहे का, निधी कुणी उपलब्ध करून दिला यासारख्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची योजना आजच्या बैठकीत आखण्यात आली असल्याचे समजते.
अल फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द
भारतीय विद्यापीठ संघाने फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द केले आहे. या विद्यापीठास एआययूचा लोगो काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. विद्यापीठाच्या
सर्व नोंदींची न्यायवैद्यक तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचीही आता ईडीमार्फत चौकशी केली जाणार आहे.
‘एनआयए’चे ५ राज्यांत छापे
अवैध बांगलादेशी नागरिकांच्या मदतीने अल-कायदा या दहशतवादी गटाने रचलेल्या हल्ल्याच्या कटाप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) पाच राज्यांत छापे टाकले. एनआयएच्या पथकांनी बुधवारी पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा व गुजरात राज्यांत संशयित दहशतवादी व त्यांच्याशी निगडित लोकांच्या घरावर छापे टाकले. या कारवाईदरम्यान किमान दहा ठिकाणी छापे टाकल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
पुढील सूचनेपर्यंत लाल किल्ला मेट्रो स्टेशन बंद
सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत लाल किल्ला रेल्वे स्टेशन बंद राहणार असल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन(डीएमआरसी)ने गुरुवारी दिली. सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची चौकशी तपास संस्था करत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक बंद ठेवण्यात आले आहे. तसेच लाल किल्ला परिसर व मंदिर येथे तपासणी सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आढळले आहे?
मुख्य संशयित डॉ. उबर नबी रामलीला मैदानानजीक एका मशिदीजवळ घुटमळताना दिसत आहे. नंतर तो एका अरुंद गल्लीत पायी जातो आणि त्याची मान उजवीकडे वळताच सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसतो. मशिदीच्या पार्किंगचे फुटेजही पोलिसांच्या हाती आहे.
सोमवार सकाळी ८:०२
ते सायंकाळी ६:५२
०७:३० : सकाळी फरीदाबादेतून एशियन हॉस्पिटलजवळ कार दिसली.
०८:०२ : एका टोल प्लाझाजवळ थांबतो, रोख रक्कम काढून देतो.
०८:१३ : बदरपूर टोल प्लाझा त्याने ओलांडला व दिल्लीत प्रवेश
०३:१९ : दुपारी लाल किल्ल्याजवळ सुनहरी मशीद परिसरात प्रवेश.
०६:२८ : याच कारमधून तो मशीद परिसराच्या बाहेर पडतो.
०६:५२ : सायंकाळी याच आय-२० कारमध्ये भीषण स्फोट होतो.
तोंडावर मास्क, सतत कॅमेऱ्याकडे नजर
तोंडावर मास्क घातलेला उमर सतत सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहत असल्याचे दिसत आहे. आपल्याला सुरक्षा पथके शोधत आहेत हे त्याला माहीत होते याचे हे संकेत आहेत.
तपासात काय आढळले?
तपास यंत्रणांनी विविध ठिकाणच्या ५०हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेने तो हरयाणातून दिल्लीत आला. ढाब्यावर जेवण केले.
दिल्लीत प्रवेशापूर्वी रात्र त्याने कारमध्येच घालवली. दिवसभर तो चेहरा लपवत राहिला.